India vs New Zealand, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली. कर्णधार रोहितनं ( Rohit Sharma) पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या ( Axar Patel) हाती चेंडू देऊन सामना सुरुवातीलाच किवींकडून हिसकावून घेतला. अक्षरनं पॉवर प्लेमध्ये २ धावांत ३ विकेट्स घेत पाहुण्यांना बॅकफूटवर टाकले आणि त्यानंतर अन्य गोलंदाज टप्प्याटप्प्यानं विकेट्स घेत राहिले. भारतानं हा सामना ७३ धावांनी जिंकला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला ( This is the biggest win ever for Team India in the T20I against New Zealand - 73 runs)
भारतीय संघानं तिसऱ्या ट्वेंटी-२०त न्यूझीलंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माची अर्धशतकी खेळीनंतर इशान किशन, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल व दीपक चहर यांनी चांगली कामगिरी करताना संघाला हा एव्हरेस्ट उभा करून दिला. रोहित- इशान किशन यांनी ६९ धावा चोपल्या. सातव्या षटकात ही जोडी तुटली. प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना इशानला बाद केले. इशाननं २९ धावा केल्या. त्याच षटकात सूर्यकुमार यादवही ( ०) माघारी परतला. सँटनरनं त्याच्या पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवून टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. इश सोढीनं रोहितला बाद केले. हिटमॅननं ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या.
वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर यांना आज मोठी खेळी करण्याची संधी होती. ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात वेंकटेशला ( २०) बाद केले. पुढच्याच षटकात अॅडम मिल्नेनं टीम इंडियाला सहावा धक्का देताना श्रेयसला ( २५) माघारी पाठवले. अय्यर्स बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर अक्षर व हर्षल हे दोन पटेल उतरले. १९व्या षटकात हर्षननं खणखणीत षटकार मारला, परंतु पुढच्या चेंडूवर हिट विकेट होऊन बाद झाला. भारतान २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. दीपक चहरनं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या.
प्रत्युत्तरात किवींचे तीन फलंदाज ३० धावांवर माघारी परतले. पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलला गोलंदाजीला आणून रोहितनं चतुर खेळ केला. अक्षरनं त्याच्या दोन षटकांत २ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. डॅरील मिचेल ( ५), मार्क चॅपमॅन ( ०) व ग्लेन फिलिप्स ( ०) यांना अक्षर पटेलनं बाद करून भारताचे निम्मे काम सोपे केले. मार्टीन गुप्तील दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ५०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या युझवेंद्र चहलनं टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली. सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर गुप्तीलचा सुरेख झेल टिपला. गुप्तीलनं ३६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावा केल्या.
जिमी निशॅम व टीम सेइफर्ट ही जोडी किवींसाठी अखेरचे आशास्थान होती. पण, सेइफर्ट ( १७) धावबाद झाला. हर्षल पटेलनं १३व्या षटकात निशॅमला ( ३) बाद करून भारताचा विजय पक्का केला. किवींचे सहा फलंदाज ७६ धावांवर माघारी परतले. इथून किवींना सावरणे अवघडच होते. चहलनं त्याच्या ४ षटकांत २६ धावा देत एक महत्त्वाची विकेट घेतली. न्यूझीलंडचा डाव १११ धावांवर गुंडाळून भारतानं ७३ धावांनी विजय मिळवला.
Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live Update : India defeats New Zealand by 73 runs and seals the series 3-0. New Zealand bowled out for just 111
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.