India vs New Zealand, 3rd T20I Live Update : राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखालील पहिल्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. रोहितचे अर्धशतक आणि अन्य फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियानं ७ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला अन् प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १११ धावांवर माघारी परतला. भारतानं ७३ धावांनी हा सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. पण, या विजयानंतर द्रविडनं खेळाडूंना एक मोलाचा संदेश दिला.
प्रथम फलंदाजी करताना रोहित- इशान किशन या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६९ धावा चोपल्या. पण, मिचेल सँटनरच्या एका षटकात किशन ( २९) व सूर्यकुमार यादव ( ०) माघारी परतले. सँटनरनं पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवले. रोहितनं दमदार खेळी करताना ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. वेंकटेश अय्यर ( २०) व श्रेयस अय्यर ( २५) यांनी चांगला खेळ केला. हर्षल पटेलनं १८ धावा केल्या. दीपक चहरनं ८ चेंडूंत २१ धावा चोपूलन भारताला ७ बाद १८४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मार्टीन गुप्तील ( ५१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. अक्षर पटेलनं ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं दोन, तर दीपक चहर, युझवेंद्र चहर व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांवर माघारी परतला.
राहुल द्रविड काय म्हणाला?''वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळून दोन दिवसांच्या विश्रांती नंतर लगेच ट्वेंटी-२० मालिका खेळणे हे न्यूझीलंडसाठी खूपच आव्हानात्मक होते. पण, भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या तयारीच्या दिशेनं योग्य पाऊल टाकले, ही आमच्यासाठी सकारात्कम बाब आहे,''असे द्रविड म्हणाला.