India vs New Zealand, 3rd T20I Live Update : इडन गार्डन अन् रोहित शर्मा हे प्रेम ट्वेंटी-२०तही दिसले. दोन वर्षांनंतर इडन गार्डनवर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) विक्रमाची आतषबाजी केली. त्यानं आज नोंदवलेला एक विक्रम हा जगात आतापर्यंत एकाही फलंदाजाला जमलेला नाही.
टीम इंडियानं कर्णधार बदलला अन् नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागू लागला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत याच नाणेफेकीनं टीम इंडियाचा घात केला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं तिन्ही सामन्यात नाणेफेक जिंकली. मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर रोहितनं तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारले. लोकेश राहुलला विश्रांती दिल्यानं रोहितसह इशान किशन सलामीला आला आणि दोघांनी इडन गार्डनवर धुरळा उडवला. या जोडीनं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ६९ धावा चोपल्या. रोहित व इशान यांनी मैदानाच्या कानाकोपऱ्याच चेंडू टोलवला.
रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५० षटकारांचा पल्लाही ओलांडला. न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्तीलनंतर असा पराक्रम करणारा रोहित जगातला दुसरा फलंदाज ठरला. कसोटीत ५०+, वन डे १००+ व ट्वेंटी-२०त १५०+ षटकार नावावर असणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. कर्णधार म्हणून रोहितनं ट्वेंटी-२०त ५० षटकारांचा विक्रम केला. विराट कोहलीनंतर ( ५९) हा दुसरा भारतीय कर्णधार, तर इयॉन मॉर्गन ( ८५), अॅरोन फिंच ( ७०), असघर अफगान ( ५३) यांच्यानंतरचा पाचवा कर्णधार ठरला. सातव्या षटकात ही जोडी तुटली. प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना इशानला बाद केले. इशाननं २९ धावा केल्या. त्याच षटकात सूर्यकुमार यादवही ( ०) माघारी परतला.
रोहितनं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे ट्वेंटी-२०तील ३०वे अर्धशतक ठरले आणि आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्यानं विराट कोहलीचा २९ अर्धशतकांचा विक्रम मोडला.
Web Title: IND vs NZ, 3rd T20I Live Update : Rohit Sharma is now the first player with: 50+ sixes in Tests, 100+ sixes in ODIs, 150+ sixes in T20Is
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.