India vs New Zealand, 3rd T20I : भारतीय संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना आज कोलकाताच्या इडन गार्डवर होणार आहे. भारतीय संघ शनिवारीच रांचीहून कोलकाता येथे दाखल झाला आणि खेळाडू थेट हॉटेलमध्ये गेले. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) विमानतळावरून थेट इडन गार्डनवर पोहोचला. त्याच्या या कृतीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु पुन्हा एका 'Mr Perfectionist' पाहायला मिळाल्यानं आनंदही झाला. न्यूझीलंडवर निर्भळ यश मिळवण्याचा द्रविडनं पक्का निर्धार केला आहे आणि त्यासाठी तो कोणतीच कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये गेले असताना राहुलनं इडन गार्डनवर जाऊन क्युरेटरशी चर्चा केली.
राहुल द्रविडची फुल टाइम मुख्य प्रशिक्षक म्हणून दणक्यात सुरुवात झाली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं पहिल्या दोन ट्वेंटी-२०त न्यूझीलंडवर सहज विजय मिळवले. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा त्याचा निर्धार आहे. इडन गार्डनवर 2019नंतर आंतरराषट्रीय सामना झालेला नाही. 2019मध्ये टीम इंडियानं डे नाईट कसोटीत बांगलादेशवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता ही खेळपट्टी कशी असेल, याची पाहणी करण्यासाठी द्रविड स्टेडियमवर गेला. डे नाइट कसोटीत 28 विकेट्स पडल्या होत्या.
द्रविडसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे हेही होते. त्यांनी क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्याशी संवाद साधला. या खेळपट्टीवर 160+ धावा होतील अशी माहिती मुखर्जी यांनी दिली.