अहमदाबाद : जगातील सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकण्याच्या निर्धाराने भारत आणि न्यूझीलंड संघ बुधवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. मालिकेतील आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत भारताच्या आघाडीच्या फळीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.
मालिकेतील दोन्ही सामने खेळपट्ट्यांमुळेही गाजले. पहिल्या सामन्यात ज्या खेळपट्टीवर किवींनी आव्हानात्मक मजल मारली, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजी कोलमडली. यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १०० धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी भारताला अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले होते. त्यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीकडेही क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, ईशान किशन आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांना संधी साधण्यात यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात पृथ्वी शॉला संधी मिळणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय या सामन्यानंतर भारतीय संघ मोठ्या कालावधीपर्यंत टी-२० सामना खेळणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंकडे आपली छाप पाडण्यासाठी ही शेवटची संधी ठरेल.
बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकल्यानंतर किशनला फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. फिरकी गोलंदाजांविरुद्ध टी-२०मध्ये गिलही अपयशी ठरत आहे. तसेच कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्रिपाठीही अपयशी ठरला आहे. गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या अनुभवी फिरकी जोडीच्या जोरावर भारताने किवींवर दडपण आणले. मोक्याच्यावेळी नो बॉल टाकणारा अर्शदीप सिंग लखनौमध्ये शानदार लयीत दिसला. त्यामुळे निर्णायक सामन्यात त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. दुसरीकडे, गोलंदाजीत दमदार कामगिरी करत असलेल्या न्यूझीलंडला फलंदाजीत कामगिरी सुधारण्याची आशा आहे. एकदिवसीय मालिका गाजवलेला ब्रेसवेल याला अद्याप आपल्या लौकिकानुसार योगदान देता आलेले नाही.
लखनौच्या सामन्यानंतर हार्दिक आणि मी ठरवले की, भविष्यात कशीही खेळपट्टी मिळाली तरी आपण तक्रार करायची नाही. आव्हानांचा सामना करण्यास सज्ज असलो की, खेळपट्टीसारखे इतर मुद्दे गळून पडतात. त्यामुळे परिस्थितीनुरूप खेळात बदल करायचा आणि सकारात्मक मानसिकतेने मैदानावर जायचे हेच आमचे यापुढे धोरण राहणार आहे.
- सूर्यकुमार यादव
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
न्यूझीलंड : मिशेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलेन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डीवोन कॉन्वे, डेन क्लीवर, जेकब डफी, लोकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकल रिपन, हेन्री शिपले, ईश सोढी आणि ब्लेयर टिकनेर.
Web Title: Ind Vs NZ 3rd T20I : Pitch, focus on top batsmen, series tied at 1-1 India vs New Zealand in decisive T20I today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.