India vs New Zealand, 3rd T20I Live Update : भारतीय संघानं तिसऱ्या ट्वेंटी-२०त न्यूझीलंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माची अर्धशतकी खेळीनंतर इशान किशन, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल व दीपक चहर यांनी चांगली कामगिरी करताना संघाला हा एव्हरेस्ट उभा करून दिला. या सामन्यात अॅडम मिल्नेनं टाकलेल्या २०व्या षटकात दीपक चहरनं ( Deepak Chahar) केलेल्या फटकेबाजीनं सर्वांची वाहवाह मिळवली. कर्णधार रोहितही चहरची फटकेबाजी पाहून अवाक् झाला आणि टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करू लागला.
रोहितसह इशान किशन सलामीला आला आणि दोघांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ६९ धावा चोपल्या. रोहित व इशान यांनी मैदानाच्या कानाकोपऱ्याच चेंडू टोलवला. सातव्या षटकात ही जोडी तुटली. प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना इशानला बाद केले. इशाननं २९ धावा केल्या. त्याच षटकात सूर्यकुमार यादवही ( ०) माघारी परतला. सँटनरनं त्याच्या पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवून टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. इश सोढीनं १२व्या षटकात भन्नाट रिटर्न कॅच घेताना रोहितचा झंझावात रोखला. हिटमॅन ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या.
वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर यांना आज मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यांनी चांगली फटकेबाजीही केली, परंतु ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात वेंकटेशला ( २०) बाद केले. पुढच्याच षटकात अॅडम मिल्नेनं टीम इंडियाला सहावा धक्का देताना श्रेयसला ( २५) माघारी पाठवले. अय्यर्स बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर अक्षर व हर्षल हे दोन पटेल उतरले. १९व्या षटकात हर्षननं खणखणीत षटकार मारला, परंतु पुढच्या चेंडूवर हिट विकेट होऊन बाद झाला. भारतान २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. दीपक चहरनं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या.