India vs New Zealan, 3rd T20I : टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे आणि या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) तसे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडच्या ६ बाद १५३ धावांचा टीम इंडियानं १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा करून यशस्वी पाठलाग केला.
या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे या मालिकेत वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर आधी खेळाडूंना संधी मिळाली. त्यापैकी वेंकटेश, श्रेयस, हर्षल, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना संधी मिळाली. चहल, ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान यांना अजूनही संधी मिळालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यानंतर रोहितला तिसऱ्या ट्वेंटी-२०त बदल करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. पण, त्यावर रोहितचे उत्तर होकारार्थी नव्हते.
''हा युवा संघ आहे आणि या खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना मैदानावर खेळण्याची पुरेशी संधी मिळणे महत्त्वाचे आहे. पुढील सामन्यात बदल करण्याचा विचार घाईचा ठरेल. संघहिताचे जे असेल, ते बदल केले जातील. पण, आता जे खेळाडू खेळत आहेत त्यांची काळजी घ्यायला हवी. ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांचीही वेळ येईल. अजून बरेच ट्वेंटी-२० सामने आहेत,''असे रोहित म्हणाला.
हर्षल पटेलनं पदार्पणात दोन विकेट्स घेतल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी ११७ धावांची भागीदारी केली. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या, तर रोहित ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.