न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना प्रथमच भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीनस्वीप केले. भारत दौऱ्यावर आलेल्या किवी संघाने ३-० ने कसोटी मालिका जिंकली. बंगळुरू, पुणे आणि मुंबई कसोटीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. इतिहासात प्रथमच न्यूझीलंडने भारतात भारताविरुद्ध मालिका जिंकली, याशिवाय त्यांनी अपराजित राहण्याची किमया साधली. टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका होत आहे. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने त्याच्या जुन्या विधानाचा दाखला देत गंभीरवर सडकून टीका केली.
न्यूझीलंडने भारताला पराभूत करुन इतिहास रचला. हा पराभव म्हणजे गौतम गंभीरने टीम इंडियाला दिलेली भेट आहे. गर्व बाळगल्यास काय होते हे समजले असेल, असे पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले. तसेच मी जेव्हा भारताचा प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव सुचवले होते तेव्हा अनेकांनी मला ट्रोल केले. पण, आता ते आठवत आहे का? असेही त्याने म्हटले. एकूणच गर्वाचे घर खाली अशा शब्दांत त्याने गंभीरला लक्ष्य केले. खरे तर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला २५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारताने सलग तिसरा सामना गमावलादरम्यान, भारतीय संघाचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडने २५ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारताला ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले. घरच्या मैदानावर भारताची इतकी वाईट अवस्था पहिल्यांदाच झाल्याने चाहते संतप्त आहेत. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, एखाद्या कसोटी सामन्यात किंवा मालिकेत झालेली हार पचवणे ही सोपी गोष्ट नाही. आम्हाला उत्तम क्रिकेट खेळणे जमले नाही हे मी मान्य करतो. न्यूझीलंड आमच्याविरुद्ध पूर्ण मालिकेत चांगली खेळली. आम्ही खूप चुका केल्या. पहिल्या दोनही सामन्यांमध्ये पहिल्या डावात आम्ही फारशा धावा करू शकलो नाही. या सामन्यात आम्हाला पहिल्या डावात आम्हाला २८ धावांची आघाडी मिळाली होती. आज मिळालेले आव्हान पार होण्यासारखे होते, पण आम्ही सांघिक कामगिरीत कमी पडलो.