IND vs NZ 3rd Test Match Live Updates | मुंबई : भारतीय संघ सलग दोन पराभवांनंतर विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या अर्थात अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही लढत होत आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या कालावधीनंतर वानखेडेवर कसोटी सामना होत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर वानखेडेवर दिवाळी साजरा करताना दिसताहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कसोटी सामना असताना आणि भारताने मालिका गमावली असतानादेखील ९० टक्के तिकिटांची विक्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताची फलंदाजी येईल तेव्हा भारतीय चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये दिसतील असे अपेक्षित आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक मोठा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन मोहम्मद सिराजला खेळवण्यात आले आहे. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान या मुंबईकर खेळाडूंवर धावा करण्याची मोठी जबाबदारी असेल. याशिवाय विराट कोहली, शुबमन गिल आणि रिषभ पंतच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान, जसप्रीत बुमराह आजारी असून, तो अद्याप आजारातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो मुंबई कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके.