IND vs NZ 3rd Test Match Live Updates | मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ६५.४ षटकांत सर्वबाद २३५ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांची कोंडी केली. जडेजाच्या फिरकीतील जादू आणि वॉशिंग्टनच्या सुंदर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला. जड्डूने १४व्या वेळी पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा खास पराक्रम करून दाखवला. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदरने ४ बळी घेतले, तर आकाश दीपला दोन बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या जुन्या शैलीत दिसला. वानखेडे स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन करताना किंग कोहली थिरकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघ सलग दोन पराभवांनंतर विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या अर्थात अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही लढत होत आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या कालावधीनंतर वानखेडेवर कसोटी सामना होत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर वानखेडेवर दिवाळी साजरा करताना दिसताहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कसोटी सामना असताना आणि भारताने मालिका गमावली असतानादेखील ९० टक्के तिकिटांची विक्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताची फलंदाजी येईल तेव्हा भारतीय चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये दिसतील असे अपेक्षित आहे.
भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके.