-अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
१२ गुण मोलाचे...
भारताने घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्यानंतर पराभवाचे तोंड पाहिले. मालिका गमावल्यानंतरही मुंबई कसोटीत विजय महत्त्वाचा झाला आहे. कारण एक विजय तुम्हाला विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी (डब्ल्यूटीसी) १२ मौल्यवान गुणांची कमाई करून देणार आहे. सलग दोन कसोटी सामने गमावल्याने भारत गुणतालिकेत डळमळीत झाला. आणखी एका पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे लागेल. त्यामुळे मुंबईचा सामना जिंकून क्लीन स्वीपची नामुष्की टाळता येणार आहे.
भारत- न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली मुंबई कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली. रविवारी तिसऱ्या दिवशी निकाल येणारच. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचे पारडे जड होते, पण हे विसरू नका की वानखेडेची खेळपट्टी फिरकीपूरक बनली. मग न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाजही कमाल करू शकतील. पुण्यातील अशाच खेळपट्टीवर पाहुण्या फिरकी गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांना नतमस्तक होताना आपण पाहिले. या सामन्यात सँटनर नाही. याचा लाभ भारताच्या फलंदाजांनी घ्यावा. तरीही विजय सोपा नाही. जिंकण्यासाठी जिवापाड मेहनत घ्यावी लागेल.
फलंदाजांची पोलखोल...
तिसरा कसोटी सामना भारताने जिंकला तरी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत फिरकीला पूरक खेळपट्ट्या बनवून भारत जिंकायचा. भारतीय संघ विरोधी संघांना २००-२५० धावांत गुंडाळून मोठ्या धावा उभारायचा आणि सामना खिशात घालायचा. आता फासे उलटे पडू लागले आहेत. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवूनदेखील विजयाची खात्री देता येत नाही. नव्या फलंदाजांसोबतच रोहित शर्मा, विराट कोहली हे अनुभवी फलंदाज फिरकीपुढे संघर्ष करताना दिसतात. फलंदाजांचा संयम सुटत चालला आहे. संयम हाच तर कसोटी क्रिकेटचा आत्मा ठरतो, पण तो भारतीय फलंदाजांमध्ये अभावानेच जाणवतो.
जखमेवर मीठ चोळले जाईल
भारताच्या कसोटी इतिहासात तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर कोणत्याही संघाने 'क्लीन स्वीप' दिलेले नाही. न्यूझीलंडने भारताला हरविल्यास ती त्यांची ऐतिहासिक कामगिरी ठरेल. दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळले जाईल. न्यूझीलंडचा सफाया होईल, असा क्रिकेट पंडितांचा तर्क असताना या संघाने भारताला त्यांच्या घरी धक्के दिले.
फटकेबाजीवर व्हावे संशोधन
फलंदाज अनेकदा चुकीचे फटके मारतात. हा टी- २० चा प्रभाव आहे असे मानले तरी ते साहसी झालेत का? माझ्या मते, यावर संशोधन होण्याची गरज आहे. चुकीच्या फटक्यांमुळे ते सहज बाद होतात. फिरकीला अनुकूल खेळपट्टी भारतीय फलंदाजांना मदत का करीत नाही? ऑस्ट्रेलियाचा नाथन लियॉन किंवा टॉड मर्फी तसेच इंग्लंडचा शोएब बशीर किंवा रेहान अहमद हे भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले. आमचे फलंदाजही अन्य फलंदाजांप्रमाणे फिरकीपुढे नतमस्तक का होतात, यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
Web Title: Ind Vs NZ 3rd Test: Need a win for 12 points and respect
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.