India vs New Zealand, 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजीला पसंती दिली असती, असे रोहित शर्मा म्हणाला. त्यामुळे मॅचमध्ये टॉसचं महत्त्व किती आहे ते अधोरेखित होते.
बुमराहला विश्रांती, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सिराजची एन्ट्री
न्यूझीलंडच्या संघाने मालिका आधीच खिशात घातली असून भारतीय संघ मालिकेचा शेवट गोड करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतील आपलं अव्वलस्थान मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली असून मोहम्मद सिराजची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.
व्हाइट वॉशची नामुष्की टाळण्याचे चॅलेंज
मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात बंगळुरुच्या मैदानात किवींनी भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला. पुण्याच्या मैदानात भारतीय संघ कमबॅक करेल, अशी आशा होती. पण इथंही न्यूझीलंडचा संघ भारी ठरला. परिणामी टीम इंडियाची घरच्या मैदानात १८ कसोटी मालिका जिंकण्याचा सिलसिला संपुष्टात आला. १२ वर्षांनी पहिल्यांदा टीम इंडियानं घरच्या मैदानात कसोटी मालिका गमावली. आता तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात व्हाइट वॉश टाळण्याचे मोठं चॅलेंज टीम इंडियासमोर आहे. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन :
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्व्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओरोरके