India vs New Zealand, 3rdT20I : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या दोन्ही सामन्यात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज शुभमन गिल, इशान किशन व राहुल त्रिपाठी यांना काही खास करता आले नाही. गोलंदाजीतही फिरकीपटू सोडल्यास जलदगती गोलंदाजांचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. अशात भारतीय संघाचा सदस्य असलेला जलदगती गोलंदाज थेट रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यासाठी पोहोचला.
इशान किशनच्या 'त्या' कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाला, BCCI ने पोस्ट केलेला Video Viral
भारताचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार ( Mukesh Kumar) रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघात मुकेशचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण, संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी त्याला रिलीज केले. बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करताना मुकेशने झारखंडविरुद्ध तीन विकेट्सही घेतल्या. त्यामुळे अखेरच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनसाठी उम्रान मलिक, शिवम मावी आणि अर्शदीप सिंग यांच्यात स्पर्धा असेल.
अहमदाबादची खेळपट्टीही फिरकीपटूंना साथ देणारी असेल आणि त्यामुळे टीम इंडिया अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह खेळणार नाही. तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या आहेच. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने मुकेश कुमारला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापर्यंत मुकेश संघासोबतच होता. रविवारी रात्री तो कोलकाता येथे पोहोचला.
- भारताला उद्याची लढत जिंकून घरच्या मैदानावर सलग १२वी मालिका जिंकण्याचा विक्रम खुणावतोय- भारताचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल व इशान किशन यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही- तिसऱ्या सामन्यात शुभमन किंवा इशान यांच्यापैकी एकाला बाकावर बसवून पृथ्वी शॉ याला संधी मिळू शकते- इशानला वगळल्यास भारताला यष्टिरक्षक जितेश शर्मा याला संधी द्यावी लागेल, सूर्यकुमार शुभमनसह ओपनिंगला येऊ शकतो
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"