भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी लढत सुपर ओव्हरमध्ये गेली. थरारक सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडला यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही सुपर ओव्हरमध्ये पराबव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता सुपर ओव्हरवर बंदी आणावी, अशी मागणी न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. फॉर्मात परतलेल्या रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती. त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. त्या जोरावर टीम इंडियानं 5 बाद 179 धावा उभ्या केल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवींच्या मार्टीन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी सावध सुरुवात केली, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवून सामन्यात चुरस निर्माण केली. पण, कर्णधार केन विलियम्सननं चिवट खेळ करताना सामना किवींच्या बाजूनं झुकवला. पण, मोहम्मद शमीनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात रोहितनं अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत केले. टीम इंडियानं मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
ग्रँट यांनी एक मजेशीर ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "मानसिक स्वास्थ्य आणि चांगल्या गोष्टींसाठी (सुपर ओव्हरवर बंदी) आपातकालीन स्थितीतही ठराव दाखवले जातील. (हा, केन विल्यमसनने दमदार खेळी साकारली.)"