जयपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच पाहुण्या न्यूझीलंडला दुहेरी धक्का बसला आहे. आधी कर्णधार केन विल्यम्सन याने मालिकेतून माघार घेतल्यानंतर आता वेगवान गोलंदाज काइले जेमिन्सन यानेही टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. काही दिवसांनंतर सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जेमिन्सनने टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. याआधी केन विल्यमसनने कसोटी मालिकेच्या तयारीसाठी माघार घेतली आहे.
याबाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी सांगितले की, आम्ही केन विल्यम्सन आणि कायले जेमिन्सन यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते या टी-२० मालिकेत खेळणार नाहीत, असा निर्णय घेतला. ते दोघेही दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची पूर्वतयारी करतील. तसेच टेस्ट टीममध्ये सहमावेश असलेले अन्य काही खेळाडूही टी-२० मालिकेत खेळणार नाहीत. पाच दिवसांच्या आत तीन टी-२० सामने आणि तीन वेगवेगळ्या शहरांमधील प्रवास यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलंडने यावर्षी जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करून पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर नुकत्याच आटोपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर-१२ फेरीत भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे आता आजपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत न्यूझीलंड भारताला कसे आव्हान देतो आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली व राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत आणि विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचा कार्यक्रमपहिला टी-२० सामना - १७ नोव्हेंबर दुसरा टी-२० सामना - १९ नोव्हेंबरतिसरा टी-२० सामना - २१ नोव्हेंबरपहिला कसोटी सामना - २५ ते २९ नोव्हेंबर दुसरा कसोटी सामना - ३ ते ७ डिसेंबर