भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. पण या दौऱ्यापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीची एक डोकेदुखी पुढे आली आहे. कोहलीलाही ही समस्या लपवून ठेवता आलेली नाही. कोहलीने ही समस्या आता सर्वांसमोर मांडली आहे.
या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसनचा, तर वन डे संघात पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या लढतीतील रणनीती स्पष्ट केली आहे. या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कसे असतील याची पुसट कल्पना दिली आहे.
पण कोहलीची डोकेदुखी ही संघ निवड नक्कीच नाही. कारण प्रत्येक सामन्यापूर्वी संघ निवडबाबत चर्चा केली जाते आणि एक व्यावसायिक क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून कोहलीसाठी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे संघ निवड ही कोहलीसाठी डोकेदुखी नक्कीच नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका संपली. त्यानंतर २-३ दिवसांमध्येच भारताला न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना व्हावे लागले. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावरही भारतीय संघाला ३ दिवसांमध्येच पहिला सामना खेळावा लागत आहे.
याबाबत कोहली म्हणाला की, " तुम्ही जेव्हा एका दौऱ्यावर जाता तेव्हा तुम्हाला वातावरणाशी जुळवून घेणे महत्वाचे असते. पण जेव्हा एखाद्या दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला लगेचच क्रिकेट सामना खेळावा लागत असेल, तर ती डोकेदुखी ठरते. त्यामुळे या समस्येवर भविष्यात तोडगा नक्कीच काढला जावा."
भारतीय संघानं 2020 सालाची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियानं श्रीलंकेला ट्वेंटी-20 मालिकेत ( 2-0) आणि ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत ( 2-1) पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षक रिषभ पंत याला दुखापत झाल्यानंतर सलामीवर रिषभ पंत यष्टिंमागे दिसला होता. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावरही हेच चित्र पाहायला मिळेल का, याची उत्सुकता सर्वांना होती. यावर विराटनं स्पष्ट मत मांडलं.