Daryl Mitchell, Jasprit Bumrah Dropped catch, World Cup 2023 IND vs NZ Live Updates : वन डे विश्वचषक स्पर्धेतील यंदाचे 'टेबल टॉपर्स' न्यूझीलंड आणि भारत यांच्यात आज धरमशाला येथे सामना रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने १९ धावांत न्यूझीलंडचे दोन बळी टिपले होते. पण त्यानंतर राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल या जोडीने दीडशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला भक्कम धावसंख्या उभारण्यास मदत केली. राचिन रविंद्र ७५ धावांवर बाद झाला. पण डॅरेल मिचेलने दमदार खेळ करत १०० चेंडूत शतक ठोकले. जसप्रीत बुमराहने त्याचा सोडलेला एक झेल भारताला महागात पडला.
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारत आज पाच गोलंदाजांसोबत मैदानात उतरला. त्याचा फटका भारताला बसला. मधल्या षटकांमध्ये भारतीय संघाला विकेट घेता आली नाही. धावगती वाढवण्यासाठी राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेलने हवाई फटके खेळण्यास सुरूवात केली. त्यावेळी राचिनचा बळी मिळाला. पण डॅरेल मिचेलला मात्र जीवनदान मिळाले. डॅरेल मिचेल ६८ धावांवर असताना, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याने हवेत फटका मारला. त्यावेळी बुमराहने चेंडूपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले, पण सीमारेषेवर त्याच्याकडून झेल सुटला आणि चेंडू चौकार गेला.
बुमराहने झेल सोडल्यानंतर मात्र डॅरेल मिचेलने १०० चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत मिचेलने ७ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
भारत- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, राचिन रवींद्र, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
आतापर्यंतच्या स्पर्धेत दोनही संघ अजिंक्य आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांचे ८ गुण असूनही नेट रनरेटच्या बळावर न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानी आहे.