नवी दिल्ली : सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. मात्र आज झालेल्या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारताच्या सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करून सामना अविस्मरणीय केला. तर दीपक हुड्डाने ४ बळी पटकावून सामन्यात रंगत आणली. भारतीय संघाने ६५ धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे.
तत्पुर्वी, यजमान न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून ईशान किशन आणि रिषभ पंत यांनी डावाची सुरूवात केली. मात्र रिषभ पंत केवळ ६ धावा करून तंबूत परतला. मात्र किशनने सावध ३६ धावांची खेळी करून साजेशी सुरूवात करून दिली. परंतु त्यालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि किशनला ईश सोधीने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली. सूर्याने ५१ चेंडूत १११ धावांची शतकी खेळी करून इतिहास रचला. त्याच्या या खेळीत तब्बल ७ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. खरं तर सूर्याच्या या शतकी खेळीमुळे भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सूर्यकुमारने सुरूवातीपासूनच ताबडतोब खेळी करून किवी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने २० षटकांत ६ बाद १९१ धावा केल्या होत्या.
भारताचा मोठा विजय भारताने दिलेल्या १९२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला घाम फुटला. कर्णधार केन विलियमसनने ५२ चेंडूत ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याशिवाय कोणत्याच किवी फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. अखेर न्यूझीलंडचा संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ६५ धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय फिरकीपटूंनी सांघिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दिपक हुड्डाने सर्वाधिक ४ बळी पटकावले, तर मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी २-२ बळी घेता आले. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
जसप्रीत बुमराहचा विक्रम काढला मोडित! लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू दिपक हुडाने ४ बळी पटकावून इतिहास रचला. हुडाने २.५ षटकात केवळ १० धावा देत ४ बळी घेतले. हुडाने डॅरिल मिशेल, ॲडम मिल्ने, ईश सोधी आणि टिम साउथी यांचा पत्ता कट केला. कोणत्याही भारतीय खेळाडूची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या धरतीवर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह हुडाने जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडित काढला आहे, याआधी बुमराने किवीच्या धरतीवर न्यूझीलंडविरुद्ध १२ धावा देऊन ३ बळी पटकावले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"