जयपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज जयपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र राजस्थानमधीलहवामान या सामन्यात व्हिलन ठरू शकते. आज राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र जयपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. हा सामना संघ्याकाळी खेळला जाणार आहे. त्यावेळी येथील तापमान १५ ते २० डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. तसेच पावसाची शक्यता नसली तरी, सामन्यातील दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत झालेल्या प्रदूषणामुळेही राजस्थानला फटका बसला होता. मात्र भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने ही बाब चिंतेचा विषय नसेल असे सांगितले होते. तसेच सामना जसजसा पुढे जाईल तसतसे तापमानही कमी होईल. येथील खेळपट्टीचा विचार केल्यास सवाई मानसिंह स्टेडियममधील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल आहे. तसेच येथे मोठ्या धावसंख्येची लढत होण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या टी-२० सामन्याच्या माध्यमातून एक नवा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीने नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नवी सुरुवात करणार आहे. तर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड एका नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.