कानपूर : पदार्पण करणारा श्रेयस अय्यर (नाबाद ७५), शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने येथील ग्रीन पार्कवर गुरुवारी सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ८४ षटकात ४ बाद २५८ धावा उभारल्या. श्रेयस ७५ आणि जडेजा ५० धावांवर खेळत आहेत. या जोडीने पाचव्या गड्यासाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी केली. दरम्यान, जडेजाने १७ वे कसोटी अर्धशतक ठोकले. त्याआधी सलामीवीर शुभमन गिल ९३ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. अंधुक प्रकाशामुळे सहा षटके आधीच खेळ थांबविण्यात आला.भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संघात तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. अय्यरने १३६ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार ठोकले. चेतेश्वर पुजाराने ८८ चेंडूत २६ आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याने ६३ चेंडूत ३५ धावा केल्या. सलामीवीर मयंक अग्रवाल हा २८ चेंडूत १३ धावा काढून माघारी परतला.
- श्रेयस हा भारतासाठी पदार्पण करणारा ३०३ वा खेळाडू बनला. नाणेफेकीआधी दिग्गज सुनील गावसकर यांनी त्याला कसोटी कॅप दिली. २६ वर्षांचा हा खेळाडू २०१७ला भारताकडून पहिला वन डे आणि टी-२० सामना खेळला. त्याने २२ वन डेत ८१३ आणि ३१ टी-२० त ५८० धावा केल्या आहेत. अय्यरच्या पदार्पणावर दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉंटिंगने लिहिले, ‘मागील काही वर्षांत तू केलेल्या कठोर मेहनतीचे हे फळ आहे. ही केवळ सुरुवात आहे. मला तुझ्यावर गर्व वाटतो.’ - श्रेयसने ९४ चेंडूत अर्धशतक गाठले. पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा देशाचा तो ४७ वा फलंदाज बनला. न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय आहे. याआधी सुरिंदर अमरनाथ (१२४), कृपालसिंग (नाबाद १००), देवांग गांधी (७५) आणि बापू नाडकर्णी (नाबाद ६८) यांचा क्रम लागतो.
जेमिसनपुढे फेल... आठव्या षटकात वेगवान गोलंदाज जेमिसनने मयंकला यष्टीमागे झेलबाद केले. यानंतर दुसऱ्या गड्यासाठी शुभमन गिल - पुजारा यांनी १३३ चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली. उपहारानंतर पहिल्या षटकात जेमिसनने गिलची दांडी गुल केली. टिम साऊदी याने पुजाराला बाद करुन भारताला तिसरा धक्का दिला. रहाणे - अय्यर यांनी चौथ्या गड्यासाठी ७० चेंडूत ३९ धावांची भागीदारी केली, तोच जेमिसनने रहाणेचादेखील त्रिफळा उडवला. त्याआधी रहाणेविरुद्ध झेलबादचे अपील झाले होते. पंचांनी त्याला बाद दिले, मात्र डीआरएसमध्ये तो नाबाद ठरला. पुढच्याच चेंडूवर जेमिसनने त्याला टिपले.
पुजाराने केले निराशपुजाराने अखेरचे कसोटी शतक ३ जानेवारी २०१९ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकवले होते. त्यानंतर २३ कसोटींच्या ३९ डावात त्याच्याकडून शतकी कामगिरी झालेली नाही. या काळात ९१ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली. त्याने ११ अर्धशतकेही ठोकली आहेत.
- वेगवान गोलंदाज उमेश यादव हा ५० वा कसोटी सामना खेळत आहे.- रचिन रवींद्र हा न्यूझीलंडकडून पदार्पण करणारा २८२ वा खेळाडू ठरला.- २०२१मध्ये भारतीय खेळाडू कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकण्यात अपयशी ठरले. ३८पैकी २०वेळा भारतीयांनी अर्धशतकी खेळी केली पण त्यापुढे धावा काढण्यात मोजकेच फलंदाज यशस्वी ठरले.- २०१९च्या सत्रात ३१ भारतीयांनी कसोटीत अर्धशतके ठोकली होती. मात्र, १३ जणांना ५०हून अधिक धावा करता आल्या. श्रेयस शुक्रवारी शतक गाठेल? याची चाहत्यांना उत्सुकता असेल.- पाचव्या क्रमांकावर खेळताना पदार्पणात कसोटी अर्धशतक पूर्ण करणारा श्रेयस अय्यर हा मोहम्मद अझरुद्दिन (१९८४), एस. बद्रिनाथ (२०१०) यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय ठरला.
गिलचे चौथे अर्धशतक -शुभमन गिलने कसोटीत चौथे अर्धशतक ठोकले. या युवा खेळाडूने ७ डावांमध्ये ५०हून अधिक धावा केल्या आहेत. गिलविरुद्ध तिसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर टिम साऊदीने पायचितचे अपिल केले होते. पंचांनी त्याला बादही दिले, मात्र भारताने रिव्ह्यू घेतला. डीआरएसमध्ये शुभमनला जीवदान मिळाले. धावफलक - भारत पहिला डाव : मयंक अग्रवाल झे. ब्लाँडेल गो. जेमीसन १३, शुभमन गिल त्रि. गो. जेमीसन ५२, चेतेश्वर पुजारा झे. ब्लाँडेल गो. साऊदी २६, अजिंक्य रहाणे त्रि. गो. जेमीसन ३५, श्रेयस अय्यर खेळत आहे ७५, रवींद्र जडेजा खेळत आहे ५०. अवांतर : ७. एकूण : ८४ षटकांत ४ बाद २५८ धावा.बाद क्रम : १-२१, २-८२, ३-१०६, ४-१४५. गोलंदाजी : टीम साऊदी १६.४-३-४३-१, जेमीसन १५.२-६-४७-३, अयाज पटेल २१-६-७८-०, सोमरविले २४-२-६०-०, रचिन रवींद्र ७-१-२८-०