Gautam Gambhir On Washington Sundar : भारतीय संघ गुरुवारी पुण्याच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. बंगळुरु कसोटी सामना गमावल्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना जिंकावाच लागेल. या महत्त्वपूर्ण सामन्याआधी वॉशिंग्टन सुंदरची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. तो पुण्याच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भागही असू शकतो. खुद्द भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, यासंदर्भातील हिंट दिली आहे.
वॉशिंग्टन सुंदरसंदर्भात काय म्हणाला गंभीर?
पुणे कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना गौतम गंभीरनं वॉशिंग्टन सुंदरला अचानक संघात घेण्यामागचं कारण सांगितले. न्यूझीलंडच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज आहेत. त्यांच्यासाठी उत्तम गोलंदाजी करू शकेल, असा गोलंदाज आम्हाला हवा होता. पुण्याच्या मैदानातील सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन अजून ठरलेली नाही. पण वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात एक उत्तम पर्याय आमच्याकडे आहे, असे गंभीर म्हणाला. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग इलेव्हनचा भाग दिसला, तर नवल वाटू नये.
रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळीनंतर मिळाली टीम इंडियात एन्ट्री
एका बाजूला भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी करंडक स्पर्धेचा हंगाम सुरु आहे. या स्पर्धेत तामिळनाडू ताफ्यातून खेळताना वॉशिंग्टन सुंदर याने दिल्ली विरुद्धच्या लढतीत २६९ चेंडूत १५२ धावा केल्या होत्या. याशिवाय गोलंदाजीतही त्याने धमक दाखवली होती. या खेळीनंतर दुसऱ्या कसोटीसाठी त्याला टीम इंडियात बोलावणं आलं आहे.
युवा क्रिकेटरची कसोटीतील कामगिरी २५ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर याने जानेवारी २०२१ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याच्या खात्यात ६ विकेट्स जमाआहेत. फलंदाजी करताना त्याने ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ९६ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.