नवी दिल्ली : मागील एक वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार खेळी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. अलीकडेच बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मायदेशातील 2 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. संघात संधी न मिळाल्याने सरफराज खानने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आगामी 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना संधी मिळाली आहे.
सरफराज खान नाराज होणे अपेक्षित होतेच. कारण 2019 नंतर मुंबईच्या या फलंदाजाने 22 डावात 134.64च्या सरासरीने 9 शतके, 5 अर्धशतके, 2 द्विशतके आणि 1 त्रिशतक झळकावून 2289 धावा केल्या आहेत. यामुळेच चाहते त्याला 'भारताचे ब्रॅडमन' म्हणतात. या कामगिरीनंतरही त्याला संधी मिळाली नाही त्यामुळे त्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
संघ जाहीर झाल्यानंतर रात्रभर झोपलो नाही - सरफराज भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सरफराज खानने निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची व्यथा मांडली. तो म्हणाला, "संघ निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आसामहून दिल्लीला आलो (रणजी ट्रॉफी सामन्यानंतर) आणि रात्रभर झोपू शकलो नाही. मी स्वतःला विचारत राहिलो की मी तिथे का नाही. पण, वडिलांशी बोलल्यानंतर मला थोडा धीर मिळाला आहे."
"माझा पण नंबर येईल""मी सराव सोडणार नाही. मी अजिबात तणावात जाणार नाही. मी प्रयत्न करत राहीन", असे त्याने अधिक म्हटले. मात्र, कुठेतरी त्याला वाईटही वाटत असल्याची कबुलीही त्याने दिली. "मी पूर्णपणे तुटलो होतो. खासकरून इतक्या धावा केल्यावर कोणासाठीही हे स्वाभाविक आहे. मी पण माणूस आहे, यंत्र नाही. मलाही भावना आहेत. मी माझ्या वडिलांशी बोललो आणि ते दिल्लीला आले. आम्ही दिल्लीतही सराव केला", अशा शब्दांत सरफराजने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
भारत विरूद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक वनडे मालिका
- पहिला सामना 18 जानेवारी, हैदराबाद
- दुसरा सामना 21 जानेवारी, रायपूर
- तिसरा सामना 24 जानेवारी, इंदूर
ट्वेंटी-20 मालिका
- पहिला सामना 27 जानेवारी, रांची
- दुसरा सामना 29 जानेवारी, लखनौ
- तिसरा सामना 1 फेब्रुवारी, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"