India T20 WC Exit: Rahul Dravid Report Card: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघातील सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. विराट कोहली, सूर्यकुमार यादव वगळता भारताच्या अन्य खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल यांचे अपयश हे भारतासाठी खऱ्या अर्थाने मारक ठरले. त्यामुळेच आता संघातील काही सीनियर्स खेळाडूंना ट्वेंटी-२० सामन्यांपासून दूर ठेवण्याचा विचार सुरू आहे. २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. असे असताना आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्या कामगिरीचाही लेखाजोखा मागवण्यात आला आहे. त्यांना आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय झाला आहे.
'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'साठी ९ नावं जाहीर; इंग्लंड, पाकिस्तानचा दबदबा, भारताचे दोघं शर्यतीत
भारताने २०१३मध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आलेले आहे. बीसीसीआयने मागच्या वर्षी राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आणि त्यासाठी त्याला सर्वाधिक १० कोटींचं वार्षिक मानधनही दिलं गेलं. पण, द्रविडने अपेक्षांवर खरा उतरला नाही. आता द्रविडसमोर २०२३चा वन डे वर्ल्ड कप हे मुख्य लक्ष्य आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने श्रीलंका व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर विजय मिळवला. शिवाय न्यूझीलंड दौऱ्यावरही कमाल करून दाखवली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्याविरुद्धच्या घरच्या मालिकेतही भारत जिंकला. पण, आशिया चषकाच्या साखळी फेरीतील अपयशानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही.
आता भारतीय संघ १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे आणि त्यासाठी राहुल द्रविडला विश्रांती दिली गेली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष VVS Laxman हा भारतीय संघासोबत न्यूझीलंडला मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार असल्याचे माहिती समोर येतेय. द्रविडच्या अनुपस्थितीत याआधीही लक्ष्मणने ही जबाबदारी सांभाळली आहे. द्रविड मायदेशासाठी रवाना झाला असून बांगलादेश दौऱ्यावर तो पुन्हा भारतीय संघासोबत असेल.
या दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले गेले आहे. रोहितनंतर आाता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी हार्दिककडेच सोपवण्याचा BCCI चा विचार आहे. त्यादिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, उम्रान मलिक हे खेळाडू संघात परतले आहेत.
जाणून घ्या कधी होणार ही मालिका..
ट्वेंटी-२० मालिका
- १८ नोव्हेंबर - वेलिंग्टन, दुपारी १२ वाजल्यापासून
- २० नोव्हेंबर - माउंट मौनगानुई, दुपारी १२ वाजल्यापासून
- २२ नोव्हेंबर - नेपियर, दुपारी १२ वाजल्यापासून
वन डे मालिका
- २५ नोव्हेंबर - ऑकलंड, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- २७ नोव्हेंबर - हॅमिल्टन, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- ३० नोव्हेंबर - क्राइस्टचर्च, सकाळी ७.३० वाजल्यापासून
- भारताचा ट्वेंटी-२० संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रिषभ पंत, शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
- भारताचा वन डे संघ - शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"