जयपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. भारताचा नवा टी-२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघामध्ये श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे. तसेच मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आले आहे. तसेच व्यंकटेश अय्यर भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तर न्यूझीलंडच्या संघामध्येही टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात खेळलेल्या संघापेक्षा चार बदल करण्यात आले आहेत.
टी-२० विश्वचषकातील निराशाजन कामगिरीनंतर भारतीय संघ नवा कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकासह क्रिकेटच्या मैदानात उतरत आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष राहणार आहे. कसोटी मालिका डोळ्यांसमोर ठेवून नियमित कर्णधार केन विल्यम्सनने विश्रांती घेतल्याने न्यूझीलंडचा संघही मोठ्या फेरबदलांसह मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडने यावर्षी जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करून पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर नुकत्याच आटोपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर-१२ फेरीत भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे आता आजपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत न्यूझीलंड भारताला कसे आव्हान देतो आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली व राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ - मार्टिन गप्टिल, डेरेल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप, टीम शिफर्ट (यष्टिरक्षक), रचिन रवींद्रा, मिचेल सेंटनर, टीम साऊदी (कर्णधार), टी. अॅस्टल, लोकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.