ऑकलंड : भारताने ट्वेन्टी-२० मालिका ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकली. पण पहिल्याच वनडे सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागाला. पण जर भारताला दुसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात संघात मोठे बदल पाहायला मिळतील. त्याचबरोबर एका खेळाडूला डच्चू देण्यात यावा, असेही म्हटले जात आहे.
ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघाने वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताच्या 347 धावांच्या प्रत्युत्तरात किवी फलंदाजांनी सुरेख खेळ केला. कोणतीही घाई न करता त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले. रॉस टेलर, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लॅथम यांना या विजयाचे श्रेय द्यायला हवं. या विजयासह न्यूझीलंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागाला. पण यापूर्वीही या मैदानात भारताला बरेच पराभव स्वीकारावे लागले आहेत.
पहिल्या पराभवाबद्दल कोहली म्हणाला की, " न्यूझीलंडने या सामन्यात चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटले होते की, आम्ही उभारलेली धावसंख्या ही पुरेशी होती. पण रॉस टेलरसारखा अनुभवी फलंदाज न्यूझीलंडकडे होता. त्याचबरोबर टॉम लॅथमनेही चांगली फलंदाजी केली. या दोघांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्यामुळे या विजयाचे श्रेय टेलर आणि लॅथम यांना जाते."
पहिल्या वनडे सामन्यात भारताने मोठी धावसंख्या रचली होती. पण भारताच्या गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये काही बदल करावे लागतील. संघात नवीन गोलंदाजाला संधी दिल्यास सामन्याचा नूर पालटू शकतो, असे म्हटले जात आहे.
दुसऱ्या वनडेसाठीच्या संघ निवडीबद्दल भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, " वनडे सामन्यांमध्ये मधली षटके फार महत्वाची असतात. त्यासाठी संघात एक अतिरीक्त फिरकीपटू असायला हवा. कारण न्यूझीलंडचे फलंदाज वेगवान गोलंदाजांचा उत्तम पद्धतीने खेळतात. त्यामुळे भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी संघात फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी द्यायला हवी. "
हरभजन पुढे म्हणाला की, " चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी भारताला विजय मिळवून देऊ शकते. पण चहलला संधी देण्यासाठी संघातून कोणत्या खेळाडूला काढायचे हादेखील प्रश्न असेल. पण चहलला संधी द्यायची असेल तर संघातून केजार जाधवला वगळू शकतो."