डॅरेल मिचेलचे शतक (१३०) आणि राचिन रविंद्रचे अर्धशतक (७५) यांच्या बळावर न्यूझीलंडने भारताला २७४ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना 'चेसमास्टर' विराट कोहलीने लौकिकाला साजेसा खेळ केला. शेवटपर्यंत पिचवर तळ ठोकून विराटने भारताला यंदाच्या विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने विश्वचषकातील न्यूझीलंडविरूद्धचा विजयाचा दुष्काळ संपवला. याआधी टीम इंडियाने २००३ साली न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता.
२७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. रोहितने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४० चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. शुबमन गिलदेखील २६ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला देखील चांगली सुरूवात मिळाली. पण अय्यर ३३ धावांवर तर केएल राहुल २७ धावांवर माघारी परतले. वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणारा सूर्यकुमार यादव गोंधळाचा बळी ठरला. विराटने धाव घेण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले. त्यानंतर मात्र विराटने रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा सलग पाचवा विजय साजरा केला.
तत्पूर्वी, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे (०) आणि विल यंग (१७) स्वस्तात बाद झाले. राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने १५९ धावांची भागीदारी केली. राचिन ७५ धावांवर बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलला इतरांची अपेक्षित साथ मिळाली नाही. ग्लेन फिलिप्स (२३) वगळता सारेच एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. टॉम लॅथम (५), मार्क चॅपमन (६), मिचेल सँटनर (१), मॅट हेन्री (०) आणि लॉकी फर्ग्युसन (१) स्वस्तात बाद झाले. मिचेलने मात्र एकाकी झुंज सुरू ठेवली. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३० धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीने ५ बळी मिळवले. कुलदीपने २ तर बुमराह-सिराजने १-१ बळी टिपला.