Join us  

IND vs NZ: पावसाची बॅटिंग अन् भारताचा विजय; हार्दिक सेनेने मालिका घातली खिशात!

भारताने न्यूझीलंडविरूद्धची टी-20 मालिका 1-0 ने जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 4:04 PM

Open in App

नेपियर : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात आला. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1-0 ने मालिकेवर कब्जा केला आहे. खरं तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून 160 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 4 बाद 75 धावांवर खेळत होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करावा लागला. यासोबतच भारताने 1-0 ने मालिका जिंकली. 

दरम्यान, 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी मोठा विजय मिळवून आघाडी घेतली होती. आजचा सामना निर्णायक होता, मात्र याचा निकाल पावसामुळे लागला आणि किवी संघाचे मोठे नुकसान झाले. सामना रद्द झाल्यामुळे भारताने 1-0 ने मालिका जिंकली अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. 

भारताला 4 मोठे धक्केभारताचे सलामीवीर ईशान किशन आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. किशन (10), रिषभ पंत (11) तर श्रेयस अय्यर खातेही न उघडता तंबूत परतला. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा खेळपट्टीवर होते. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने 2 बळी घेऊन भारताला मोठे धक्के दिले. तर ॲडम मिल्नेला 1 बळी घेण्यात यश आले. ईशान किशन दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. तर रिषभ पंतला तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टीम साउदीने शिकार केले. खरं तर श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही आणि त्याला पहिल्याच चेंडूवर किवी संघाच्या कर्णधाराने बाद केले. सूर्यकुमार यादवने साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश आले. सूर्या 10 चेंडूत 13 धावा करून बाद झाला त्याला ईश सोधीने बाहेरचा रस्ता दाखवला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयपाऊस
Open in App