India vs New Zealand, ICC Rankings : न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर दणदणीत विजयाची नोंद केली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांना धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली आणि इंग्रजांनी आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गमावले. न्यूझीलंड वन डे तील नवा नंबर वन संघ बनला. पण, न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकून टीम इंडियाला नंबर वन बनता आले असते, परंतु ते आता शक्य नाही. नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात टीम इंडियाने क्रमवारीतील आहे ते स्थानही गमावले आहे.
शिखर धवनकडून सुटलेला झेल, शार्दूल ठाकूरने एका षटकात दिलेल्या २५ धावा अन् गोलंदाजांकडे अनुभवाची असलेली कमतरता यामुळे भारतीय संघाला हार मानावी लागली. न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ३ बाद ३०९ धावा करून विजय मिळवला. केन ९८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर,तर लॅथम १०४ चेंडूंत १९ चौकार व ५ षटकारांसह १४५ धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हे अपयशी ठरले. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे ११२ रेटिंग गुण होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही ११२ रेटिंग गुण होते. पण, न्यूझीलंडविरुद्ध पहिली वन डे गमावल्यानंतर भारताचे रेटिंग गुण कमी झाले आणि ते चौथ्या क्रमांकावर सरकले. भारतीय संघ ११० रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्रमांकावर पकड मजबूत केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"