ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये वन डे व ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित 71 वर्षांत प्रथमच कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. त्यानंतर द्विदेशीय वन डे मालिकाही जिंकून इतिहास घडवला. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून न्यूझीलंड दौऱ्याकडे पाहिले जात आहे. वर्ल्ड कपपूर्वी भारताचा हा अखेरचा परदेश दौरा आहे.
न्यूझीलंडमध्ये द्विदेशीय वन डे मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी निराशाजन आहे. भारतीय संघ बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा 1975-76 साली न्यूझीलंडमध्ये वन डे मालिकेसाठी दाखल झाला होता. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला. त्यानंतर सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालीही भारताला 1980-81 मध्ये 2-0 असा पराभव पत्करावा लागला.
द्विदेशीय वन डे मालिकेसाठी 1993-94 मध्ये भारतीय संघ तिसऱ्यांदा न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. 1998-99 मध्ये अझरूद्दीनच्याच नेतृत्वाखाली भारताने पाच सामन्यांची मालिका पुन्हा 2-2 अशी बरोबरीत सोडवली. 2002- 03 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली येथे आला होता. त्यावेळी सात वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 5-2 असा विजय मिळवला.
भारतीय संघ येथे केवळ एकदाच वन डे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने 2008-09च्या दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 असा विजय मिळवला होता. तब्बल 34 वर्षांनी भारताने न्यूझीलंडमध्ये मालिका विजयाचा तिरंगा फडकावला होता. मात्र, 2013-14 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पुनरावृत्ती करता आली नाही. न्यूझीलंडने ती मालिका 4-0 अशी जिंकली. आता कर्णधार विराट कोहलीला 2008-09च्या दौऱ्याचा तो पराक्रम करून दाखवायचा आहे.