नवी दिल्ली - भारतीय संघ बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली. मात्र फिरकीपटू कुलदीप यादव याच्यासाठी हा दौरा निराशाजनक ठरला. त्याला या संपूर्ण दौऱ्यात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन त्याला संधी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. तत्पूर्वी टी-२० मालिकेमध्येही त्याला संधी मिळाली नव्हती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलदीप यादवचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत ७२ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने अनुक्रमे ११८ आणि ४४ वळी टिपले आहेत. तसेच तो ७ कसोटी सामनेही खेळला असून, त्यात त्याने २६ बळी टिपले आहेत. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये कुलदीप यादव हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याला संपूर्ण दौऱ्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान, पहिल्या वनडेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. त्याला संपूर्ण दौऱ्यात एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.
न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका १-० अशी जिंकल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी आवश्यक आहे.