IND vs NZ : विश्वचषक स्पर्धेतील दोन तगडे संघ, आत्तापर्यंतच्या कामगिरीतील दोन अपराजित संघ भारत व न्यूझीलंड आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांनी सलग ४ सामने जिंकले आहेत आणि आज यापैकी एका संघाची विजयी घोडदौड रोखली जाणार आहे. दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे, तरीही त्यांची कामगिरी ही उजवी ठरली आहे. त्यामुळे, हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून तेथील ढगांकडेही डोळे फिरले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने ५० षटकांचा पूर्ण सामना खेळवला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, दिवसभरात सामन्याच्या वेळेत पाऊस पडल्यास आजचा सामना कमी षटकांचा खेळवला जाऊ शकतो.
Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी धर्मशालामध्ये सर्वाधिक तापमान १८ डिग्री सेल्सियस असणार आहे. तर, येथील सर्वात कमी तापमान ११ डिग्री सेल्सियस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाशात पावसाचे ढग असून वाऱ्याचा वेग २६ किमी प्रतितास असणार आहे. विशेष म्हणजे दुपारी २ वाजता सामना सुरू होत असून त्याचवेळेस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, दुपारी ३ नंतर पाऊस पडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. त्यामुळे, सामना उशिरा सुरु होण्याचीही शक्यता आहे.
आजचा सामना रद्द झाल्यास काय होईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील धर्मशाला येथे होणारा आजचा सामना रद्द झाल्यास रिझर्व्ह डे ची सोय नाही. कारण, वर्ल्डकप २०२३ च्या नियमावलीनुसार सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल जाणार नाही. दोन्ही संघाला १-१ गुण देऊन बरोबरी साधण्यात येईल. विशेष म्हणजे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत एकही सामना पावसामुळे रद्द झाला नाही. मात्र, गुवाहटी आणि तिरुवअनंतपूरम येथील सराव सामने पावसामुळे रद्द झाले होते.
हार्दीक पांड्याच्या जागी कोण?
हार्दिक पांड्याच्या जागी कोण, हा प्रश्नाच्या उत्तरात इशान किशन व सूर्यकुमार यादव ही नावं आहेत. पण, आज सराव सत्रात सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) दुखापत झालीय आणि तो बरा न झाल्यास इशानचा पर्याय आहे. पण, इशानलाही मधमाशीने चावले आहे आणि तोही सराव अर्धवट सोडून हॉटेलमध्ये परतला. त्यामुळे, या प्रश्नाचे उत्तर मैदानातच पाहायला मिळू शकेल.