Join us  

नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला

क्रिकेटच्या देवाचा दाखला देत नेटकऱ्यांनी घेतली रोहित-विराटची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:39 PM

Open in App

घरच्या मैदानात मागील १२ वर्षांत सलग १८ मालिका विजयासह दिमाखदार रेकॉर्ड नावे घेऊन मिरवणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या संघाने बंगळुरु पाठोपाठ पुण्याचं मैदान मारत भारतीय भूमित पहिली वहिली कसोटी मालिका जिंकली. मायदेशातील भारताचा विजयी रथ पाहुण्या संघाने रोखला. दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजीतील कमतरता हेच टीम इंडियाच्या पराभवामागचं सर्वात प्रमुख कारण ठरलं. 

क्रिकेटच्या देवाचा दाखला देत नेटकऱ्यांनी घेतली रोहित अन् विराटची शाळा

टीम इंडियाची  आण बाण आणि शान असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आता बॅटिंगच्या मुद्यावरून या दोघांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचा दाखला देत काही नेटकऱ्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माची शाळा घेतली आहे. 

आता इथून पुढे कधीच विराटची तुलना सचिनशी करु नका! 

  

न्यूझीलंड विरुद्धच्या पुण्यातील कसोटी सामन्यात विराट कोहली दोन्ही डावात फिरकीपटू मिचल सँटनरच्या जाळ्यात फसला. पहिल्या डावात तर तो फुलटॉस चेंडूवर बोल्ड झाला. विराट कोहलीची नेहमीच सचिन तेंडुलकरसोबत तुलना केली जाते. एका नेटकऱ्याने मिचल सँटनर विरुद्ध कोहलीचा फ्लॉप शो आणि दिवंगत आणि महान फिरकीपटू शेन वॉर्न विरुद्धचा सचिन तेंडुलकरचा हिट शो दाखवणारा व्हिडिओ शेअर करत यापुढे चुकूनही विराटची तुलना सचिनशी करु नका, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केल्याचे दिसून येते. 

सचिन चाळीशीत रणजी सामना खेळला, ही मंडळी तसं का नाही करू शकत?

 

एका नेटकऱ्यानं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी देशांतर्गत क्रिकटपासून दूर राहण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावरून दोघांना ट्रोल केल्याचे दिसते. बीसीसीआयने टीम इंडियात खेळायचं असेल तर प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरायला हवे, असा कठोर निर्णय घेतला. पण या नियमातून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मुभा मिळाली. रोहित शर्मा २०१६ पासून तर विराट कोहली २०१२ पासून देशांतर्गत क्रिकेटकडे फिरकलेला नाही. सचिन तेंडुलकर चाळीशीत रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मग ही मंडळी तसे का करू शकत नाहीत? असा प्रश्न उपस्थितीत करत धावांसाठी संघर्ष करणाऱ्या रोहित-विराटला नेटकऱ्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिल्याचे दिसते. चाळीशीत सचिन तेंडुलकर रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचा व्हिडिओही या नेटकऱ्याने शेअर केला आहे. जो व्हायरल होताना दिसतोय. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकरन्यूझीलंड