रांची - भारत आणि न्यूझीलंडमधील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळला गेला, त्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता दोन्ही संघांमधील दुसरा सामना १९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या आयोजनावर संकटाचे सावट आहे. तसेच या सानम्याच्या आयोजनाविरोधात काही जणांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा दुसरा टी-२० सामना रद्द करण्याची किंवा अर्ध्या प्रेक्षक क्षमतेसह सामना आयोजित करण्याची परवानगी देण्याची मागणी झारखंड हायकोर्टात दाखल याचिकेमधून करण्यात आली आहे.
ॉत्यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाबाबत जेव्हा राज्यातील मंदिर, कोर्ट आणि अन्य कार्यालयेसुद्धा ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करत आहेत. तर आता कुठल्या नियमांतर्गत राज्य सरकारने क्रिकेट स्टेडियममध्ये १०० टक्के क्षमतेसह काम करण्याची परवानगी दिली आहे, असा सवाल याचिकेमधून विचारण्यात आला आहे. तसेच उद्या होणारा सामना स्थगित करण्याची किंवा शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेसह स्टेडियमच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी यासाठी कोर्टाने विशेष आग्रहसुद्धा केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी होऊन याबाबतच्या राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देता येईल, असे अधिवक्त्यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने न्यूझीलंड आणि भारतामध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी स्टेडियमच्या ५० टक्के सिट बुकिंगची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर हा निर्णय मागे घेतला गेला. तसेच आयोजकांना सामन्यासाठी स्टेडियमच्या सर्व सिट बुक करण्याची परवानगी देण्यात आली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी रांचीमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.