नवी दिल्ली – टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बायो-बबलविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यादिवशी हा बबल फुटेल तेव्हा खूप काही सहन करावं लागेल असा इशारा शास्त्री यांनी दिला आहे. रवी शास्त्री यांच्यासोबतच जसप्रीत बुमराह, विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंनी बायो-बबलवर भाष्य केले आहे. त्यामुळे BCCI आता यावर निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टसनुसार, बीसीसीआय आता रोटेशन पॉलिसीवर जोर देत आहे ज्याची सुरुवात न्यूझीलंड दौऱ्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळेच टीममधील सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. नव्या खेळाडूंना टीममध्ये खेळण्याची संधी दिली आहे. त्यामुळे सिनिअर्सना आराम आणि भविष्यातील तयारीसाठी सज्ज राहण्याची नीती एकाचवेळी करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात रोटेशन पॉलिसीचा वापर करण्यात आला आहे. तिथं टेस्टमध्ये एक कोअर ग्रुप तयार करुन वनडे आणि टी-२०साठी वेगळी टीम बनवली आहे. प्रत्येक स्पर्धेनंतर काही खेळाडूंना आराम दिला जाईल आणि नव्या खेळाडूंना खेळण्यासाठी टीममध्ये संधी देण्यात येईल.
इनसाइड स्पोर्टसला एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. सातत्याने बायोबबलमध्ये राहणं सोप्पं नाही त्यासाठी रोटेशन स्क्वॉड गरजेचा आहे. न्यूझीलंड दौऱ्यापासून याची सुरुवात केली जाईल. देशातंर्गत क्रिकेटमध्ये आपल्याकडे खूप टँलेट आहे. त्यामुळे कोअर ग्रुपशिवाय त्या खेळाडूंनाही खेळण्याची संधी प्राप्त होऊ शकते असं ते म्हणाले.
अजूनही अनेक खेळाडूंना मिळणार आराम
भारतीय टीम मागील १ वर्षापासून सतत क्रिकेट खेळत आहे. ६ महिन्यापासून खेळाडू बायोबबलमध्ये वावरत आहेत. अशावेळी पुढील १ वर्षात अनेक सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयनं अनेक खेळाडूंना आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मोहम्मद शामीसारख्या खेळाडूंना आराम मिळाला आहे. तर रोहित शर्मादेखील टेस्ट सामन्यावेळी आराम करेल.
माहितीनुसार, रोटेशन पॉलिसीनुसार श्रेयस अय्यरलाही टेस्ट टीममध्ये आणलं जाईल. जेणेकरून भविष्यात टेस्ट टीम मजबूत होऊ शकेल. जेणेकरून एखाद्या सिनिअर खेळाडूला आराम दिला तरी हे खेळाडू खेळण्यास सज्ज असतील. टीम इंडियामध्ये अशाच खेळाडूंची निवड केली जाईल जे पुढील १-२ वर्ष टीम इंडियासाठी खेळण्यास पात्र आहेत. विशेष म्हणजे टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलपर्यंतही धडक देता आली नाही. रवी शास्त्री यांनी त्यांच्या निरोप समारंभात सांगितले की, अनेक खेळाडू मानसिक, शारिरीक थकले आहेत. कारण मागील ६ महिन्यापासून ते बायोबबलमध्ये आहेत. अनेक खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला भेटता आले नाही. खेळाडू हे मशीन नाहीत. जर टी-२० वर्ल्डकप आणि आयपीएल स्पर्धेदरम्यान आराम मिळाला असता तर निकाल वेगळा असू शकता असा दावा त्यांनी केला आहे.