India vs New Zealand, T20I Series : भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. जयपूर पाठोपाठ टीम इंडियानं रांचीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj) याला दुखापत झाली आणि त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले. कोलकाता येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही त्याचे खेळणे अनिश्चित आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) सिराजला टपली मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान मीडियाकडूनही या व्हिडीओचे वार्तांकन करण्यात येत आहे. पण, रोहितनं ही टपली मस्करीत मारली आहे.
हा व्हिडीओ पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातील असावा. यात मोहम्मद सिराज, रोहित व लोकेश राहुल हे तिघे राहुल द्रविडच्या मागे डगआऊटमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यात रोहितनं सिराजला टपली मारली आहे. याचे वार्तांकन करताना पाकिस्तानी मीडियाकडून थप्पड मारली असं करण्यात आले आहे.
दुसऱ्या ट्वेंटी-२० त भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४), मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. सिराजच्या जागी संघात स्थान मिळालेल्या हर्षल पटेलनं पदार्पणात २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतानं १७.२ षटकांत हे लक्ष्य पार केले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या, तर रोहित ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला.
Web Title: IND vs NZ, T20I : Indian captain Rohit Sharma slaps Mohammad Siraj, video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.