IND vs NZ: सुपर कमबॅक!! मिचेलच्या फटकेबाजीनंतर न्यूझीलंडला मोहम्मद शमीचा 'पंच'

डॅरेल मिचेलने केली १३० धावांची दमदार खेळी, राचिन रविंद्रच्याही ७५ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:57 PM2023-10-22T17:57:02+5:302023-10-22T18:05:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Team India Super comeback by Mohammad Shami with 5 Wickets after Daryl Mitchell Power Hitting Century Rachin Ravindra | IND vs NZ: सुपर कमबॅक!! मिचेलच्या फटकेबाजीनंतर न्यूझीलंडला मोहम्मद शमीचा 'पंच'

IND vs NZ: सुपर कमबॅक!! मिचेलच्या फटकेबाजीनंतर न्यूझीलंडला मोहम्मद शमीचा 'पंच'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohammed Shami Daryl Mitchell, World Cup 2023 IND vs NZ : डॅरेल मिचेलच्या तुफानी शतकानंतर (१३०) भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला ५० षटकांत २७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. एकेवेळी ३०० पार सहज मजल मारण्याची शक्यता वाटणाऱ्या न्यूझीलंडला मोहम्मद शमीने रोखले. पहिल्या डाव सामन्यात वगळण्यात आल्यानंतर, शमीने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पाच विकेट्स घेत आपली निवड सार्थ ठरवली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने १३० तर राचिन रविंद्रने ७५ धावा केल्या.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने सलामीवीर डेवॉन कॉन्वेला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर विल यंगला १७ धावांवर त्रिफळाचीत केले. १९ धावांत दोन बळी गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या डावात मोठी भागीदारी झाली. राचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने दीडशतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. १२ धावांवर राचिन रविंद्रचा झेल जाडेजाकडून सुटला. त्याने ८७ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार खेचत ७५ धावा केल्या. राचिन आणि मिचेल यांनी संघाच्या धावसंख्येत १५९ धावांची भर घातली.

राचिन बाद झाल्यावर डॅरेलने एक बाजू लावून धरली आणि संघाला २५० पार मजल मारून दिली. डॅरेल मिचेलने तुफानी फटकेबाजी करत १०० चेंडूत शतक पूर्ण केले. पण त्याला दुसऱ्या फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. शेवटच्या आठ षटकांत भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन केले. डॅरेल मिचेलने शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर शेवटच्या षटकांत तो १२७ चेंडूत १३० धावा काढून बाद झाला. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांनी खेळी सजवली.

गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. शमीने विल यंग, राचिन रविंद्र, डॅरेल मिचेल, सँटनर आणि हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने आपल्या १० षटकांमध्ये ५४ धावा देत ५ बळी मिळवले. त्याशिवाय, कुलदीप यादवने २, तर बुमराह-सिराजने १-१ बळी टिपला.

Web Title: IND vs NZ Team India Super comeback by Mohammad Shami with 5 Wickets after Daryl Mitchell Power Hitting Century Rachin Ravindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.