Rohit Sharma, IND vs NZ: न्यूझीलंडनेमुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा तिसऱ्या कसोटीत २५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली. भारताच्या भूमीत टीम इंडियाला हा पहिलाच व्हाईटवॉश मिळाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होतीच. पण तिसऱ्या सामन्यात भारताला पहिल्या डावाअखेर आघाडीही मिळाली होती. परंतु अवघ्या १४७ धावांचे आव्हान तगड्या भारतीय फलंदाजीला पेलवले नाही. भारताचा डाव अवघ्या १२१ धावात आटोपला. गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या रोहित शर्माने तीन कसोटीतील ६ डावांत मिळून फक्त ९१ धावा केल्या. या मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून अयशस्वी ठरल्याचे रोहितने पराभवानंतर कबूल केले. त्यात आता माजी मुंबईकर क्रिकेटपटू संजय मांजरेकरने रोहितबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
रोहितचा आता विश्वास राहिलेला नाही
"रोहित शर्मा बेजबाबदार किंवा मनमानी बॅटिंग करतो असं मी म्हणणार नाही. कारण तो त्याच्या परीने धावा करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो. आतापर्यंत त्याने आपल्या वेगळ्या शैलीने संघाला विजय मिळवून दिले आहेत. पण एक गोष्ट जाणवते की आता त्याचा त्याच्या बचावात्मक खेळीवर विश्वास राहिलेला नाही. तुम्हाला त्याच्या खेळीत ते स्पष्ट जाणवते. एखादं LBW चं अपील झालं की त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. अशा वेळी तो संयम गमावतो आणि थेट त्या गोलंदाजावर हल्ला चढवायचा प्रयत्न करतो. शेवटच्या डावातही त्याने तेच केले कारण आव्हान फार मोठे नव्हते. कदाचित एखाद दुसरा चांगला फटका बसला असता तर रोहित शर्माकडून बांगलादेश विरूद्धची खेळी पुन्हा पाहायला मिळू शकली असती," असे संजय मांजरेकर म्हणाला.
रोहितने काय दिली कबुली?
"जेव्हा तुम्हाला छोट्या आव्हानाचा पाठलाग करायचा असतो तेव्हा तुम्ही धावा करणे अपेक्षित असते. माझ्याही डोक्यात धावांचा विषय होता पण मला धावा काढणं जमलं नाही. आम्ही झटपट धावा काढायला गेलो पण ते आम्हाला जमलं नाही. त्यामुळे आमचीच फजिती झाली. भारतीय परिस्थितीत जसे खेळायला हवे तसे आम्ही खेळलो नाही, त्याचाच परिणाम पराभवाच्या रुपाने आम्हाला दिसला. यावेळी आमचे प्लॅन फसले. मी कर्णधार म्हणून उत्तम नव्हतो आणि फलंदाज म्हणूनही फारसा चांगला नव्हतो. एकूणच एक संघ म्हणून आम्ही पूर्णपणे अयपशी ठरलो," असे अतिशय प्रामाणिकपणे रोहित शर्माने मान्य केले.