भारत-न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी सर्फराज खान आणि रिषभ पंत या जोडीनं ३ बाद २३१ धावांवरुन भारताच्या डावातील नव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दोघांनी अगदी आपल्या अंदाजात भारतीय क्रिकेट चाहत्यांना जे पाहायचं आहे, तो शो दाखवून दिला. ही जोडी जमली अन् शतकी भागीदारीसह दोघांनी किवी गोलंदाजांचे खांदीही पाडले. पण..
पंत अन् सर्फराज खान यांच्यात दिसला ताळमेळाचा अभाव, अन्...
चौथ्या दिवसाच्या खेळात एका क्षणी असं काहीसं घडलं ज्यामुळे टीम इंडियातील ड्रेसिंग रुमसह भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढवली होती. इथं न्यूझीलंड संघाकडून चूक झाली अन् सर्फराज खान अन् रिषभ पंत यांची भागीदारी बहरली. पण त्याआधी दोघांच्यातील ताळमेळाचा अभावही दिसून आला. पंतनं जवळपास विकेट गमावलीच होती. पण तो वाचला. दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर सर्फराज खान उड्या मारून धाव नको.. असं ओरडून सांगताना दिसला.
असं घडलं तरी काय? पंतला रनआउट होण्यापासून वाचवण्यासाठी सर्फराजनं मारल्या उड्या
चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ५६ व्या षटकात मॅट हेन्री गोलंदाजीसाठी आला. यावेळी ९६ धावांवर खेळणारा सर्फराज खान स्ट्राईकवर होता. दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर असणारा रिषभ पंत ६ धावांवर खेळत होता. हॅन्रीच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर सर्फराज खान याने लेट कट शॉट मारत चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं टोलावला. पहिली धाव पूर्ण केल्यावर पंत दुसऱ्या धावेसाठीही अर्ध्या क्रिजपर्यंत पोहचला होता. दुसरीकडे धाव नको हे सांगण्यासाठी सर्फराज खान अक्षरश: उड्या मारताना दिसला. यावेळी पंत जवळपास रन आउट झाल्यात जमा होते. पण न्यूझीलंड खेळाडूंना त्याचा फायदा उठवता आला नाही. अन् जोडी फुटता फुटता वाचली. त्यानंतर स्टेडियममधील उपस्थितीत प्रेक्षकांनीही सुटकेचा निश्वास सोडल्याचे पाहायला मिळले. याशिवाय भारतीय ड्रेसिंग रुममध्ये हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. त्यामागचं कारण कदाचित सर्फराज खाननं धावेसाठी नकार देताना मारलेल्या उड्या हेच असावं.
सर्फराज-पंत यांच्यात शतकी भागीदारी
ताळमेळाचा अभाव दिसला पण त्यानंतर जोडीनं न्यूझीलंडला पुन्हा संधी दिली नाही. सर्फराज खान याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. दुसरीकडे पंतनं अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. पावासमुळे खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने ३ बाद ३४४ धावा केल्या होत्या. भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा फक्त १२ धावांनी पिछाडीवर होता.