ind vs nz 3rd test : भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना इतिहासात प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील विजयासह पाहुण्या किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सलग दोन पराभवामुळे टीम इंडिया टीकाकारांच्या निशाण्यावर आली आहे. कर्णधार रोहित शर्माने स्पष्टीकरण देताना पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने याबद्दल भाष्य केले नव्हते. पण, आता तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गंभीरने पत्रकार परिषदेत बोलताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. तसेच केवळ फलंदाजांना दोषी ठरवता येणार नसल्याचे त्याने सांगितले.
भारताच्या पराभवाला सर्वजण जबाबदार आहेत. केवळ फलंदाजांमुळे टीम इंडियाला उतरती कळा लागली असे मी म्हणता येणार नाही. आताच्या घडीला अनुभवी खेळाडूला विश्रांती देऊन नव्या चेहऱ्याला संधी दिली जावी अशी परिस्थिती नाही. हर्षित राणा संघाचा भाग नाहीये... ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करण्यासाठी तो इथे आहे, असे सांगतानाच बाकी सर्वजण निवडीसाठी उपलब्ध आहेत आणि आम्ही उद्या ते स्पष्ट करू, असे गौतम गंभीरने मुंबई कसोटीच्या एक दिवस आधी सांगितले.
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, पराभवातूनही शिकता येते. मला वाटते की, यातून युवा खेळाडूंना चांगला क्रिकेटपटू बनण्यास मदत होईल. कानपूर कसोटीत मिळालेला विजय... यांसारख्या कामगिरीमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. कसोटी क्रिकेट हे कसोटी क्रिकेटप्रमाणेच खेळायला हवे. एका दिवसात चार-पाच सत्र आपण फलंदाजी करत असू तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारता आली पाहिजे.
दरम्यान, न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढ्य भारताला प्रथमच त्यांच्या घरात हरवले. पुणे कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला आणि पाहुण्या किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील पराभवासह भारत मोठ्या कालावधीनंतर मालिका जिंकण्यात अपयशी ठरला. मागील तब्बल २९५ महिन्यांमध्ये केवळ तीन संघांना भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया (२००४) आणि इंग्लंडने (२०१२) ही किमया साधली होती. आता या यादीत न्यूझीलंडच्या (२०२४) संघाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडच्या संघाने ६९ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केले. न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी हा सोनेरी क्षण असून, दारुण पराभवामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सेनेला लक्ष्य केले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल स्थानी असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.
Web Title: IND vs NZ test series After India's defeat, Gautam Gambhir finally broke his silence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.