ind vs nz test series : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींवर प्रकाश टाकला. जर गरज भासल्यास दोन दिवस फलंदाजी करू शकेल आणि एका दिवसात ४०० धावा करेल असा संघ मला अपेक्षित असल्याचे गौतम गंभीरने सांगितले. १६ तारखेपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने २-० ने मोठा विजय साकारला.
भारतीय संघाने निर्भयपणे क्रिकेट खेळावे असे मला वाटते. जर संघाने आक्रमक खेळ केल्यास त्याचा फायदाच होईल. असे केल्यास संघ कधी कधी १०० धावांच्या आत देखील सर्वबाद होऊ शकतो. त्यांनी एका दिवसात ४००-५०० धावा केल्या तर काय बिघडले. आपल्याला जोखीम पत्करुन आक्रमक खेळावे लागेल. १०० वर टीम इंडिया गारद झाली तरी आम्ही प्रशिक्षक म्हणून मैदानात उतरुन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सुरुच ठेवू. अशाच पद्धतीने खेळ पुढे जाऊ शकतो, असे गंभीरने नमूद केले.
गंभीर पुढे म्हणाला की, मी चेन्नईत सांगितले होते की, एका दिवसात ४०० धावा करू शकेल आणि दोन दिवस फलंदाजी करुन सामना अनिर्णित संपवू शकेल असा संघ मला बनवायचा आहे. यालाच आपण प्रगती म्हणू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये जर तुम्ही नेहमीच्या शैलीत खेळत राहिलात तर त्याला प्रगती म्हणता येणार नाही. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये खूप सारे खेळाडू आहेत, जे दोन दिवस फलंदाजी करू शकतील. सामना जिंकणे हा आमचा पहिला उद्देश्य आहे. जर सामना अनिर्णित करण्यासाठी आम्ही खेळत असू तर हा दुसरा किंवा तिसरा पर्याय आहे.
तसेच हा गोलंदाजांचा काळ आहे असे मी समजतो. फलंदाजांची एकप्रकारे मक्तेदारी मोडून काढणे महत्त्वाचे आहे. फलंदाजांनी १००० धावा केल्या तरी संघ कसोटी सामना जिंकेल याची शाश्वती नसते. पण, गोलंदाजांनी २० बळी घेतल्यास आपण सामना जिंकू याची ९९% गॅरंटी असते, असे गौतम गंभीरने आणखी सांगितले.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
राखीव खेळाडू - हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
IND vs NZ कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
पहिला कसोटी सामना - १६ ते २० ऑक्टोबर, २०२४ - बंगळुरु
दुसरा कसोटी सामना- २४ ते २८ ऑक्टोबर, २०२४ - पुणे
तिसरा कसोटी सामना ०१ ते ५ नोव्हेंबर, २०२४ - मुंबई
Web Title: ind vs nz test series head coach Gautam gambhir said, We want to be the team that can score 400 in a day and also the team that can bat for two days to draw a Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.