IND vs NZ Test : कसोटी मालिकेत बांगलादेशला चीतपट केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने तयारीला सुरुवात केली असून, याची झलक समोर आली आहे. किवी संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. बंगळुरू येथून मालिकेला प्रारंभ होईल. रोहित शर्माची न्यूझीडंलविरुद्धची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली आहे. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये ५३.०० च्या सरासरीने धावा केल्या. दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुणे येथे तर अखेरचा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
कर्णधार रोहित शर्मा सराव करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्यादृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची मालिका दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच न्यूझीलंडला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे किवी संघाला WTC च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी यजमान भारताविरुद्ध विजय संपादन करावा लागेल.
दरम्यान, सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सहज जिंकून भारताने विजयी सलामी दिली. आज बुधवारी नवी दिल्ली येथे या मालिकेतील दुसरा सामना होत आहे. खरे तर मुंबईत रोहित शर्मा सरावासाठी मैदानात उतरला असता हिटमॅनला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली.
India vs New Zealand कसोटी मालिका
पहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरू
दुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई
Web Title: IND vs NZ test series Mission New Zealand Rohit Sharma starts preparations
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.