Indian Test Squad for new Zealand : शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असून त्यासाठी बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. कर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे, तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी झालेल्या यश दयालला न्यूझीलंडविरुद्धच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.
यश दयाल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. यश दयालला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्याचा फायदा आरसीबीला झाला आहे. कारण यश दयाल आता ३१ ऑक्टोबरपर्यंत टीम इंडियाच्या संघात नसेल. तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाही किंवा पदार्पण करू शकणार नाही आणि त्यामुळे तो अनकॅप्ड खेळाडू म्हणूनच कायम राहिल. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडे त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सोपवायची आहे.
माहितीनुसार, अनकॅप्ड खेळाडूला रिटेन केल्यास फ्रँचायझींना चार कोटी रुपये द्यावे लागतील. कॅप्ड खेळाडूला रिटेन करण्यासाठी किमान ११ कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे RCB संघ यश दयालला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकते आणि त्यामुळे त्यांच्या मोठ्या रकमेची बचत होईल. जर यश दयालने टीम इंडियासाठी पदार्पण केले असते तर त्याला कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले असते आणि आरसीबीला जास्त पैसे मोजावे लागले असते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
राखीव खेळाडू - हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
IND vs NZ कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
पहिला कसोटी सामना - १६ ते २० ऑक्टोबर, २०२४ - बंगळुरु
दुसरा कसोटी सामना- २४ ते २८ ऑक्टोबर, २०२४ - पुणे
तिसरा कसोटी सामना ०१ ते ५ नोव्हेंबर, २०२४ - मुंबई
Web Title: IND vs NZ Test Yash Dayal may be retained by RCB as an uncapped player for IPL 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.