Join us  

बोल्टविरुद्ध संयम पाळून मार्ग दाखविणे रोहितचे काम!

भारतीय संघाची खरी कसोटी आज लागणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:54 AM

Open in App

गौतम गंभीर, भारतीय संघाची खरी परीक्षा आज, रविवारपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशला नमवून आम्ही स्वत:ची पाठ थोपवून घेतली. पण खरे आव्हान पुढे असेल. न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला आणि त्यानंतर २९ ला इंग्लंड व त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘दम’ सिद्ध करावा लागेल. त्यातच हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे संघाची डोकेदुखी वाढली.

विश्वचषकाआधी भारताने ऑस्ट्रेलियाचा सामना केला तेव्हा हार्दिक खेळला नव्हता. सूर्याने सहा धावा केल्या. शार्दूल ठाकूर तज्ज्ञ गोलंदाज होता. संघ व्यवस्थापन पुन्हा तोच मार्ग अवलंबू शकतो. सूर्या ‘एक्स फॅक्टर’ ठरतो. धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजास पूरक असेल तर शार्दूल मोठी भूमिका बजावू शकतो. माझे मन तर ईशान किशनच्या बाजूने आहे, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. सहाव्या स्थानावर त्यालादेखील संधी मिळू शकते. धर्मशालाच्या खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल यावर बरेच विसंबून आहे. फिरकीला अनुकूल असेल तर पांड्याचे स्थान अश्विनला द्यावे. असे झाल्यास अष्टपैलू म्हणून जडेजा, अश्विन आणि शार्दूल यांची जबाबदारी वाढणार आहे.

न्यूझीलंड पॉवर प्लेदरम्यान भारताला धक्के देण्याच्या प्रयत्नांत असेल. प्रभावी रणनीती, भूमिकेतील स्पष्टता आणि ताकदीनुसार खेळण्याची क्षमता यावर त्यांचा भर असतो. चपळ क्षेत्ररक्षण हे न्यूझीलंडचे आणखी एक अस्त्र. त्यांचा रचिन रवींद्र युवराजचे स्मरण करून देतो. उंच बॅकलिफ्ट, बॅट स्विंग आणि ट्रिगर मूव्हमेंट या सर्व बाबी युवराजसारख्याच आहेत. तो युवीसारखा क्लास दाखविण्यात यशस्वी होईल का, हे पाहावे लागेल. (गेमप्लॅन/ दिनेश चोप्रा मीडिया)

आजची लढत भारतीय फलंदाजी वि. न्यूझीलंडची गोलंदाजी अशी होणार आहे. ट्रेंट बोल्टचा मुकाबला करण्यासाठी रोहित शर्मा कुठले अस्त्र वापरतो हे पाहावे लागेल. मिचेल स्टार्क, शाहीन शाह आफ्रिदी आणि मुस्तफिजुर रहमान यांच्या तुलनेत बोल्ट चतुर आहे. तो खूप धोकादायक आहे. त्याचे चेंडूवरील नियंत्रणही चांगले आहे, पण रोहितदेखील ‘ट्रेंडसेटर’ आहे. त्याने आतापर्यंत उल्लेखनीय फलंदाजी केली. तो वेगवान माऱ्याला न घाबरता मोठे फटके मारण्यास सज्ज असतो. पण बोल्टविरुद्ध संयम पाळावा लागेल. शिवाय युवा जोडीदार शुभमनलादेखील मार्गदर्शन करावे लागेल. हे दोन्ही सलामीवीर चेंडू खेळण्याची घाई करणार नाहीत, अशी आशा आहे. दोघांनीही न डगमगता संधीच्या प्रतीक्षेत असायला हवे.

 

टॅग्स :गौतम गंभीरवन डे वर्ल्ड कप