आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्सनं १८ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम खर्च करत रवींद्र जाडेजाला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. CSK संघानं खेळलेला हा डाव सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडणारा होता. कारण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह त्यानेही आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या निर्णयामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या रिटेन खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नसेल, अशी चर्चा रंगली. पण या सर्व चर्चा फोल ठरल्या. एवढेच नाही तर त्याला १८ कोटी या तगड्या रक्कमेसह रिटेन करण्यात आले.
अन् टीम इंडियाच्या मदतीला धावून आला जड्डू
ज्या मंडळींना चेन्नईच्या संघाने त्याच्यासाठी १८ कोटी का मोजले? असा प्रश्न पडला आहे त्यांना मुंबईच्या मैदानातून खुद्द रवींद्र जाडेजानं उत्तर दिले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या ३ विकेट्स घेत पहिलं सत्र गाजवलं. पण त्यानंतर विल यंगनं डॅरेल मिचेच्या साथीनं डावाला आकार दिला. ही जोडी शतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना जड्डू टीम इंडियाच्या मदतीला धावून आला.
एका ओव्हरमध्ये घेतल्या २ विकेट्स!
न्यूझीलंडच्या डावातील ४५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जाडेजानं विल यंगच्या रुपात टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले. न्यूझीलंडच्या या बॅटरनं १३८ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीनं ७१ धावांची खेळी केली. विल यंग आणि डॅरेल मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. जड्डूनं अप्रतिम चेंडूवर विल यंगला स्लिपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विकेट किपर बॅटर टॉम ब्लंडेल याला तर जड्डूनं खातही उघडू दिले नाही.
शार्प टर्नसह फलंदाजांना दिला चकवा
मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. सुंदर गोलंदाजी करत वॉशिंग्टन यानं किवी संघाचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) आणि स्टार बॅटर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. या दोन विकेटमध्ये त्याने ग्लेन फिलिप्सच्या विकेट्सचीही भर घातली. शार्प टर्नसह त्याने फलंदाजांना दिलेला चकवा हा त्याच्या गोलंदाजीतील ताकद दाखवून देणारा आहे. हीच गोष्ट चेन्नई सुपर किंग्सनं त्याच्यावर खेळलेला डाव फुसका बार नाही, हे दर्शवणारी आहे. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात कडाक्याच्या उन्हात त्याने २ तास सलग १४ षटके गोलंदाजी करत आपल्या फिटनेसचाही दर्जा दाखवून दिलाय.