आज भारत आणि न्यूझीलंडचा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघाचा २०२३ विश्वचषक स्पर्धेत परभाव झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ अव्वल तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, या सामन्यात न्यूझीलंड संघाचे मनोधैर्य उंचावेल, कारण आयसीसी स्पर्धेत त्यांचा भारताविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे.
२००३च्या विश्वचषकापासून टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने न्यूझीलंड संघाने जिंकले. तर, २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मोडले होते. भारतीय संघाला आता त्या पराभवाचाही बदला घ्यायचा आहे.
भारत आणि न्यूझीलंडचे संघ १४ वेळा आमनेसामने आले आहेत ज्यात आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीचा समावेश आहे. जसे की एकदिवसीय विश्वचषक, टी-ट्वेंटी विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप. यापैकी भारताने केवळ तीन सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने १० सामने जिंकले आहेत. पावसामुळे एक सामना रद्द झाला आहे. टीम इंडियाने १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला दोनदा पराभूत केले होते. यानंतर २००३ च्या विश्वचषकात त्यांचा सात गडी राखून पराभव झाला होता. यानंतर टीम इंडियाला कोणत्याही आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
सूर्याच्या मनगटाला लागला चेंडू, ईशानच्या डोक्याला मधमाशीचा चावा!
धर्मशाला मैदानावर शनिवारी टीम इंडियाच्या सरावाच्यावेळी सूर्यकुमार यादवच्या मनगटाला चेंडू जोरात लागल्याने तो तळमळताना दिसला. दुसरीकडे फ्लड लाईटमध्ये नेटमध्ये फलंदाजीला आलेल्या ईशानच्या डोक्याला मधमाशीने चावा घेतला.
धर्मशालाचा रेकॉर्ड...
एकूण लढती ०७, प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी: ०३ वेळा, पहिल्या डावात सरासरी धावा २०३, सर्वोच्च धावसंख्या इंग्लंड ३६४ / ९, वैयक्तिक सर्वोच्च खेळी: डेव्हिड मलान १४० धावा, उत्कृष्ट गोलंदाजी सुरंगा लकमल १०-४- १३-४. भारत सामने ०४, विजय ०२. पराभव ०२. न्यूझीलंड सामना: ०९. विजय ०९.