Join us  

IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका

भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' दोन्ही संघातील लढत अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:00 PM

Open in App

ACC T20 Emerging Teams Asia Cup India A wins by 7 runs Against vs Pakistan A  : तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियानं (भारत अ) इमर्जिंग आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तान अ संघाला पराभूत केले आहे. भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' दोन्ही संघातील लढत अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. पण शेवटी भारतीय संघानं बाजी मारत मोहिमेची सुरुवात अगदी धमाक्यात केली आहे. भारत 'अ' संघाने या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १८३ धावा केल्या होत्या. भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला निर्धारित २० षटकात ७ बाद १७६ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाने ७ धावांनी सामना जिंकला.

दोन्ही संघाकडून  भारत 'अ' संघाचा कॅप्टन तिलक वर्माची खेळी ठरली सर्वोच्च  

 अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ३५ (२२) आणि प्रभसिमरन सिंग (Prabhsimran) ३६ (१९) या सलामी जोडीनं भारत 'अ' संघाला दमदार सुरुवात करुन दिल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या या जोडीनं पहिल्य पॉवर प्लेमध्ये ६८ धावा ठोकल्या. कॅप्टन तिलक वर्मानं (Tilak Varma) ३५ चेंडूतील २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४४ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोन्ही संघाकडून एखाद्या फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. नेहाल वधेरानं (Nehal Wadhera) २२ चेंडूत २५ धावा तर रमनदीप सिंग (Ramandeep Singh) याने ११ चेंडूत १७ धावांची खेळी केली.

पाकिस्तानच्या डावाची खराब सुरुवात, शेवटच्या षटकात त्यांनी सामन्यात ट्विस्ट आणलं, पण...

 हायहोल्टेज लढतीत धावांचा पाठलाग करताना  पाकिस्तान 'अ' संघाची सुरुवातच खराब झाली. त्यांनी पहिल्या दोन विकेट्स अवघ्या २१ धावांत गमावल्या होत्या. पण सलामीवीर यासिर खान (Yasir Khan) याने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. निशांत सिंधू याने त्याला तंबूत धाडले. त्यानंतर कासिम अक्रम (Qasim Akram) आणि अराफत मिन्हास (Arafat Minhas)यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. कासिम २१ चेंडूत २७ धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे अराफत याने २९ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात  अब्दुल समद (Abdul Samad) आणि अब्बास आफ्रिदी (Abbas Afridi) यांनी सामन्यात ट्विस्ट आणले. पाकच्या अब्दुल समदनं १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह २५ धावा केल्या. पण त्याला शेवटपर्यंत मैदानात थांबता आले नाही. दुसरीकडे अब्बास ९ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने १८ धावा करत अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानात थांबला पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात काही यश आले नाही. 

भारताकडून अंखुल कंबोज ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज

भारतीय संघाकडून गोलंदाजीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून दिसलेला अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय रसिख सलाम (Rasikh Dar Salam) आणि निशांत सिंधू  (Nishant Sindhu) यांनी प्रत्येकी २-२ विकेट्ससह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटतिलक वर्मा