India vs Pakistan, World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील विश्वचषक 2023 सामन्याला दहशतवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमधील सामन्यापूर्वी आणि नंतर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असणार आहे. अहमदाबाद पोलिसांनी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी NSG ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कपच्या महासंग्रामासाठी एक लाखांहून अधिक लोक स्टेडियममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सर्व पोलिस दलांव्यतिरिक्त, तीन एनएसजी टीम देखील स्टेडियमची सुरक्षा करण्यासाठी तैनात असतील असे सांगण्यात येत आहे.
स्टेडियम उडवून देण्याची धमकी आल्यावर 'अलर्ट मोड'
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतामध्ये तब्बल ११ वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये वन डे सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अहमदाबाद पोलिसांनी कोणताही धोका उद्भवू नये या उद्देशाने अभेद्य सुरक्षा व्यवस्थेची ब्लू प्रिंट तयार केली आहे. दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली होती. यानंतर केंद्रीय यंत्रणा सतर्क आहेत. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने ५०० कोटी रूपयांची मागणी केली असून तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी केली आहे.
७ हजार पोलीस तैनात
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. यानंतर अहमदाबादचे पोलिस आयुक्त आयपीएस जीएस मलिक यांनी सांगितले की, या सामन्यासाठी अहमदाबाद पोलिसांकडून ७ हजार पोलीस तैनात केले जातील. याशिवाय ४ हजार होमगार्ड्सचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मलिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, सामन्याच्या सुरक्षेसाठी 3 एनएसजी टीम आणि 1 ड्रोन विरोधी टीमदेखील असेल. बॉम्ब डिस्पोजेबल स्क्वॉड सोबत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम देखील तैनात असेल.