Join us  

IND vs PAK: पाकिस्तानला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या सामन्याआधी स्टार गोलंदाज रूग्णालयात

सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने वाढल्या पाकिस्तानच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 1:34 PM

Open in App

IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यानंतर आता दुसरा गोलंदाजही जखमी झाला असून त्याला रूग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनंतर आता मोहम्मद वसीम ज्युनियर यालाही दुखापत झाली. शाहीन आशिया कपमधून बाहेर गेला असताना, वसीमचा संघात समावेश करण्यात आला होता. पण आता सरावादरम्यान वसीमलाही दुखापत झाल्याने हा पाकिस्तानला धक्का मानला जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद वसीम ज्युनियरला आयसीसी अकादमीमध्ये नेट प्रॅक्टिस दरम्यान पाठीत दुखू लागले. यानंतर व्यवस्थापनाने या गोष्टीची दखल घेत वसीमला तातडीने MRI साठी रुग्णालयात पाठवले. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही नवी माहिती मिळालेली नाही. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वसीमला खेळणे कठीण असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत बाबरसाठी मोठी अडचण होणार आहे.

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की जर वसीम जखमी झाला असेल आणि प्रकरण थोडे गंभीर असेल तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. कारण टी२० विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत वसीमला आशिया चषकातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघासाठी हा नक्कीच मोठा धक्का असेल. पण विश्वचषकाची तयारी लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आशिया चषकानंतर पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ७ सामन्यांची टी-२० मालिका आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर तिरंगी मालिका खेळायची आहे. यानंतर टी२० विश्वचषक सुरू होईल.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App