IND vs PAK Asia Cup 2022: क्रिकेट चाहत्यांना तब्बल वर्षभराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक असा क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना या महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळला जाणार आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्टला हा सामना होणार आहे. गेल्या वेळी टी-२० विश्वचषकात दोन संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने विजय मिळवला होता. आता यावेळी भारतीय संघ हिशेब चुकता करण्यासाठी मैदानावर उतरणार असतानाच, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने टीम इंडियाला डिवचलं आहे.
"क्रिकेटमध्ये विजय आणि पराजय हा होतच असतो. पण रणनीतीचा विचार केला तर पाकिस्तान सध्या भारतापेक्षा मजबूत संघ दिसतो. टीम इंडियाने एका वर्षात ७ कर्णधार बदलले आहेत. त्यांच्यासाठी संघाची बांधणी करणं खूपच कठीण होऊन बसणार आहे. टीम इंडियाकडे चांगले खेळाडू आहेत हे नक्कीच बरोबर आहे. पण सर्वोत्तम १६ मधून प्लेइंग ११ चा संघ निवडणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे. आणखी एक बाब म्हणजे गेल्या वेळीही त्यांचा संघ चांगला होता, पण भारतीय संघाच्या चुकीमुळे पाकिस्तानचा संघ जिंकला होता. आता या वेळीही टीम इंडियाच्या चुकीमुळेच पाकिस्तानचा संघ विजयी होईल", अशी भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ याने केली.
दरम्यान, दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कोणतीही द्विपक्षीय मालिका या दोघांच्यात खेळली गेलेली नाही. टीम इंडिया आणि पाकिस्तान नेहमी फक्त ICC टूर्नामेंट किंवा आशिया कपमध्येच एकमेकांसमोर खेळताना दिसतात. आशिया चषकानंतर भारत आणि पाकिस्तान यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही खेळणार आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून फायनलचा सामना १३ नोव्हेंबरला रंगणार आहे.
Web Title: IND vs PAK Asia Cup 2022 Team India will lose to Pakistan cricket team once again this year says Pak Ex Cricketer Rashid Latif
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.