Rohit Sharma vs Shaheen Shah Afridi, IND vs PAK Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर 4 ची फेरी सुरू आहे. पहिल्या फेरीतून सर्वोत्तम चार संघ पुढील फेरीत खेळत आहेत. सुपर 4 मधील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी भारताने जोरदार तयारी केली आहे. पण रोहित शर्माचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय मानला जातोय. पाकिस्तान विरूद्ध साखळी फेरीच्या सामन्यात रोहितला फार स्वस्तात माघारी परतावे लागले. विशेष म्हणजे, शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर रोहित पुरता गोंधळलेला दिसला. त्याच्या याच खेळीचा संदर्भ घेत, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने रोहितवर टीका केली.
"शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर खेळणार रोहित शर्मा हा खरा रोहित शर्मा नाहीये. हा तर त्याचा डुप्लिकेट वाटतोय. स्टंट करण्यासाठी सेम दिसणारा माणूस असतात, तसा एक माणूस उभा ठेवलाय असं वाटतंय. शाहीन रोहितच्या डोक्यात पूर्णपणे घुसून बसलाय. कोणत्याही गोलंदाजासाठी रोहितने आपला स्टान्स बदलला नव्हता, आपली फलंदाजीची पद्धत बदलली नव्हती. पण हल्ली मी काय पाहतोय? रोहित स्टान्स बदलतोय, चेंडू हुकतोय आणि मग क्लीन बोल्ड देखील होतोय. शाहीन आफ्रिदीने नक्कीच रोहितच्या फलंदाजीवर परिणाम केलाय. भारत-पाकिस्तान मॅचचे दडपण काय असते, ते यातून साऱ्यांना कळू शकेल," अशा शब्दांत अख्तरने रोहितच्या खेळीवर टिपण्णी केली.
पावसाची शक्यता किती टक्के?
हवामानाच्या अंदाजानुसार रविवारच्या सामन्यात पावसाची शक्यता ९० टक्के आहे. यामुळे सोमवार हा सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे, परंतु अंदाजानुसार राखीव दिवशी ९० टक्क्यांऐवजी १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये हवामान स्वच्छ झाले तर तो चमत्कारच घडेल.
राखीव दिवसाची सोय
भारत-पाक यांच्यातील साखळी सामन्यात पावसामुळे चाहत्यांचा आणि खेळाडूंचा हिरमोड झाला होता. सुपर-4 च्या सामन्यात मात्र चाहत्यांचा असा हिरमोड होणार नाही. कारण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास, काय होणार याबाबत माहिती देण्यात आली. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांशी सामने खेळले. दोनही सामन्यात पावसाने चाहत्यांना निराश केले. ही निराशा टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. म्हणूनच उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पण हवामानाचा अंदाज पाहता, दोन्ही दिवस पाऊस पडणार असल्याने क्रिकेटप्रेमींना खेळाचा कितपत आनंद लुटता येईल, याबाबत साशंकताच आहे.